प्राचीन राजस्थानी बावडी व मंदिर मोजते शेवटची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:55+5:302021-07-31T04:35:55+5:30
तुमसर : राजस्थानी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली १५० वर्षांपूर्वीची तालुक्यातील गोबरवाही येथील बावडी (विहीर) आणि मंदिर शेवटच्या घटका मोजत ...
तुमसर : राजस्थानी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली १५० वर्षांपूर्वीची तालुक्यातील गोबरवाही येथील बावडी (विहीर) आणि मंदिर शेवटच्या घटका मोजत आहे. मंदिराच्या छताला गळती लागली असून, प्राचीन वारसा जतन करण्यासाठी स्थानिक विकास निधी अथवा पर्यटन विकास निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
गोबरवाही येथे दानशूर सेठ गोवर्धनलाल अग्रवाल यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी मंदिर व बावडीची निर्मिती केली होती. राजस्थानी पद्धतीने बांधलेली बावडी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. येथील बावडीचे पाणी मंदिरात येणाऱ्या भाविकांसह ग्रामस्थांची तहान भागवित होती. मंदिराचे बांधकाम करणारे सेठ गोवर्धनलाल यांचे वंशज शहरात वास्तव्याला आहेत. कालांतराने गावात विहीर व कूपनलिका बांधकाम केल्याने बावडीच्या पाण्याचा वापर कमी झाला. त्यामुळे विहिरीच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले.
२०१८ मध्ये येथे आमदार निधीतून समाज भवनाचे बांधकाम करण्यात आले. समाज भवनाच्या छताचा उतार येथील हनुमान मंदिराच्या दिशेने करण्यात आला बांधकामात तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यामुळे पावसाळ्यात समाजमंदिराच्या छतावरील संपूर्ण पाणी हनुमान मंदिराच्या छतावर पडतो. मंदिराचे बांधकाम प्राचीन असल्याने मंदिराच्या छताला गळती लागली. त्यामुळे मंदिर परिसरात सतत ओलावा राहतो.
आता मंदिर दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असून, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली विहीर जतन करण्याची गरज आहे. स्थानिक रहिवासी पुरुषोत्तम मिश्रा, ललित तिवारी, भुवनेश्वर देशकर, अरविंद वाकीकर या सर्व गावातील नागरिक मंदिर परिसराची देखभाल करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहेत. स्थानिक विकास अथवा पर्यटन विकास योजनेतून निधी उपलब्ध करून दिल्यास बावडी व प्राचीन मंदिराला गतवैभव मिळेल.
बॉक्स
पायऱ्यांची विहीर म्हणजे बावडी
बावडी एक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असते. पायऱ्यांनी तयार केलेली विहीर म्हणजे बावडी. देशातील विविध भागत बावडी तयार करण्यात आल्या होत्या. त्याचा मुख्य उद्देश स्नान करण्यासाठी, धार्मिक विधीसाठी बावड्या तयार केल्या जात होत्या. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात त्या काळी या बावड्याची निर्मिती दानशूरांनी केल्या. मात्र आता त्याकडे दर्लक्ष होत आहे.