बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:47 PM2018-03-30T22:47:25+5:302018-03-30T22:47:25+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेला बावनथडी प्रकल्प अखेर अनेक अडथळे पार करीत पुर्णत्वाच्या मार्गावर आहे.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेला बावनथडी प्रकल्प अखेर अनेक अडथळे पार करीत पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. रामटेक-तुमसर राज्य महामार्गाला लागून ही मुख्य वितरिका असून काटेबाम्हणी शिवारातून जाणाऱ्या या प्रकल्पाच्या मुख्य वितरिकेला मोठमोठे भगदाड पडले आहेत. निकृष्ट बांधकामाचा हा बोलका पुरावा म्हणता येईल.
सन १९७८ मध्ये तुमसर-मोहाडी तालुक्याला वरदान ठरणारा बावनथडी प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. २३ कोटी रूपयांचा हा प्रकल्प ७०० कोटी रूपयांवर पोहोचला असून या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे काटेबाम्हणी शिवारात मुख्य वितरिकेला भगदाड पडले आहे. एकीकडे प्रकल्प पूर्णत्वाकरिता जलदगतीने कामे सुरू असली तरी दुसरीकडे या प्रकल्पाच्या दुरूस्तीची कामे करावी लागत आहे.
१० वर्षांपूर्वी या वितरिकेच्या अस्तिकरणाची कामे करण्यात आली होती. या १० वर्षात वर्षातून किमान दोन ते तीनवेळा या प्रकल्पाचे पाणी वितरिकेतून सिंचनासाठी सोडण्यात आले तर २० ते २२ वेळा पाणी वाहून गेले. काटेबाम्हणी शिवार मुख्य प्रकल्पापासून सुमारे ३५ कि़मी. लांब अंतरावर आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्गाचा वेग कमी राहतो. या वितरिकेत केवळ सहा ते सात वर्षापूर्वी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
काटेबाम्हणी ते खापा शिवारात सध्या काही ठिकाणी मुख्य वितरिका दुरूस्तीची कामे केली जात आहे. वितरिकेला भगदाड पडल्याने बांधकामाचा दर्जा निकृष्ठ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे. वितरिकेवरील रस्त्याची माती एका बाजुने ढासळलेली आहे. बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य व इतर लहान वितरिकांना ठिकठिकाणी भगदाड पडलेले आहे. परंतु अद्याप येथील कामांची चौकशी करण्यात आलेली नाही.
हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यावर हा प्रकल्प तांत्रिक विभागाला हस्तांतरण होणार असल्याची माहिती आहे. वितरिका बांधकामाची चौकशी करण्यात आली तर सत्य उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु चौकशी कोण करणार हा मुख्य प्रश्न आहे.
वितरिका दुरूस्ती ही एक प्रक्रिया आहे. काटेबाम्हणी शिवारातील वितरिकेला भगदाड पडल्याची पाहणी करून चौकशी करण्यात येईल. आपण येथे नव्याने रूजू झालेलो असून याबाबत अधिक काही सांगता येणार नाही.
-पी. व्ही. वाघमोडे, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प तुमसर.