तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीपात्र झाले वाळवंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 05:00 AM2021-04-30T05:00:00+5:302021-04-30T05:00:49+5:30
बावनथडी नदीचा उगम बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा डोंगरात आहे. सुमारे ४६ किलोमीटरच्या अंतर पार करून तुमसर तालुक्याच्या सीमेत दाखल होते. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेतून वाहते. या नदीवर धरण बांधण्यात आले असून लाभक्षेत्रातील नदीचे पात्र पूर्ण कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजना संकटात सापडलेल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट उभे झाले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना महामारीत पाण्याचे संकट भीषण होण्याची शक्यता असून तुमसर तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी जीवनदायी बावनथडी नदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. ऐन उन्हाळ्याचा मे महिना अजून शिल्लक आहे. नदी तीरावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजना त्यामुळे प्रभावित होणार असून तालुका पातळीवर नियोजन करण्याची गरज आहे.
बावनथडी नदीचा उगम बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा डोंगरात आहे. सुमारे ४६ किलोमीटरच्या अंतर पार करून तुमसर तालुक्याच्या सीमेत दाखल होते. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेतून वाहते. या नदीवर धरण बांधण्यात आले असून लाभक्षेत्रातील नदीचे पात्र पूर्ण कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजना संकटात सापडलेल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट उभे झाले आहे. मे महिन्यात नदीपात्रातून पाणी विसर्ग करण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
बावनथडी नदी तुमसर तालुक्यातील बपेरा गावाजवळ वैनगंगा नदीला येऊन मिळते. या आंतरराज्य नदीतून मध्य प्रदेशातील नदीपात्रातून बेसुमार रेतीचा उपसा करण्यात आला. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होऊन नदीपात्र दरवर्षी कोरडे पडत आहे. सध्या नदीपात्रात झुडपी वनस्पती वाढली आहे. जिकडे नजर टाकावी तिकडे झुडपी वनस्पती व रेती साठा दिसतो. दुथडी भरुन वाहणाऱ्या बावनथडीचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे.
लाखांदूर तालुक्यात उष्म्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
लाखांदूर : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. एप्रिल महिन्यातच जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली असून पशुपालकांना भटकंती करावी लागत आहे. गतवर्षी समाधानकारक पावसाळा झाला होता. त्यामुळे यंदा उन्हाची तीव्रता कमी जाणवेल, असा अंदाज होता. मात्र, महिनाभरापासून उन्हाचा पारा ४० अंशाच्यावर पोहोचल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. अवकाळी पावसामुळे जनावरांसाठी साठवण करून ठेवलेला चारा खराब झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न ऐरणीवर आला होता. एप्रिलमध्येच चारा आणि पाणीटंचाई भासत असल्याने येत्या मेपर्यंत भयावह परिस्थिती निर्माण हाण्याची भीती आहे. पाण्यासाठी पशुपालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नदी-नाले आटल्याने विहिरीचे पाणी जनावरांना पाजावे लागत आहे. दुथडी भरून वाहणारी चुलबंद नदी यंदा कोरडी पडली आहे. याचा फटका चुलबंद नदीकाठावरील नागरिकांसह पशुंनादेखील बसत आहे. अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नदी पात्रातून केली आहे. येत्या काही दिवसांत पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे.