सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यातील बावडी झाली कचराकुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 05:33 PM2022-04-20T17:33:55+5:302022-04-20T17:35:45+5:30

सानगडी येथील ऐतिहासिक किल्ला आणि बावडीची व इतर मंदिरांची पुरातत्व विभागाकडे नोंदच नाही.

Bawdi in the historical fort of Sangadi became a garbage dump | सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यातील बावडी झाली कचराकुंडी

सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यातील बावडी झाली कचराकुंडी

Next
ठळक मुद्दे६० पायऱ्यांची बावडी : पुरातत्व विभागात नोंदच नाही

संजय साठवणे

साकोली (भंडारा) : भोसले कालीन सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यातील दोन बावडी (पायरीची विहीर) अखेरच्या घटका मोजत असून पाण्यासाठी वापर होत नसल्याने या बावडीत आता केरकचरा फेकला जातो. परिसरात झुडपी वनस्पती वाढल्याने किल्ल्यासह येथील प्राचीन वास्तूला धोका निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरातत्व विभागाकडे नोंदच नाही.

साकोली तालुक्यातील सानगडी हे प्राचीन गाव. भोसले कालीन सहानगड म्हणजे आजचे सानगडी. याठिकाणी किल्ला असून दोन पायऱ्याच्या विहिरी अर्थात बावडी आहेत. एक बावडी सुस्थितीत असली तरी दुसरी मात्र लोकांनी कचराकुंडी केली आहे. ही बावडी केवळ जलस्त्रोतच नव्हे तर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. बांधकाम केवळ दगड चुन्याने केले आहे. मात्र आता या वास्तूची दुरवस्था झाली आहे.

सानगडी येथील ऐतिहासिक किल्ला आणि बावडीची व इतर मंदिरांची पुरातत्व विभागाकडे नोंदच नाही. या वास्तूची नोंद करण्यात यावी म्हणून अनेकदा पुरातत्व विभाग, राज्य सरकार व लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार केला. परंतु अद्यापही ही वास्तू राज्य संरक्षित झाली नाही.

अशी आहे प्राचीन बावडी

सानगडीच्या किल्ल्यामध्ये दोन प्राचीन बावडी आहे. या विहिरीचे बांधकाम दगड आणि चुन्यात करण्यात आले. बावडीत उतरण्यासाठी ५० ते ६० पायऱ्या असून आतील भागात दोन मोठ्या खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये युद्धाच्या वेळेस भोसले कालीन लोक मुक्कामाने राहत होते. आत गेल्यानंतर खोल गर्तेत थंडगार पाणी असते. ते कधीही आटत नाही. परंतु आता याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.

उंच टेकडीवर सानगडीचा किल्ला

सानगडी येथील उंच टेकडीवर २ हेक्टर ४३ आर मध्ये हा किल्ला आहे. नागपूरच्या रघुजी राजे भोसले यांनी १७३४ मध्ये हा किल्ला बांधला. गोंडराजा भक्त बुलंदशहा नंतर त्यांचा मुलगा चांद सुलतान गादीवर बसला. त्यांच्या मृत्यूनंतर वलीशाह नावाच्या दासी पुत्राने त्यावर कब्जा केला. तेव्हा चांद सुलतानच्या पत्नीने मदतीसाठी वऱ्हाडातून रघुजी राजे यांना पाचारण केले. रघुजीने युद्ध करून वलीशहाला पराजित केले. त्यावेळेस सानगडी विभागात राजा खानचा पुत्र मोहम्मद खान शासन करीत होता. त्याला रघुजी राजाने शिवनी प्रांतात दिवाण म्हणून पाठविले व स्वत: सानगडी ते प्रतापगड विभागावर सत्ता स्थापित केली.

Web Title: Bawdi in the historical fort of Sangadi became a garbage dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.