सावधान! कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:23+5:30
परराज्य व जिल्ह्यातून नागरीक आपल्या गावी पोहोचत आहेत. पण शहरी व ग्रामीण भागातील निगरगट्ट प्रशासनाने बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे कोरोनाच्या रूग्णांत वाढ होताना दिसत आहे. जिल्हासह तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रशासनाची धावपळ होताना दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : ५७ दिवस ‘लाकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करणाऱ्या तालुकावासीयांना ‘लॉकडाऊन’ शिथिल होताच अवघ्या ८ दिवसांत धक्का बसला. तालुक्यातील ग्राम गणखैरा व आबेंतलाव येथे कोरोनाचा रूग्ण मिळाल्याने परिसरातील गावे सील करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (दि.२३) तालुक्यात ३ कोरोनाग्रस्त रूग्ण मिळाल्याने सर्वच दहशतीत असून रस्त्यांवर कमालीची शांतता बघायला मिळत आहे.
परराज्य व जिल्ह्यातून नागरीक आपल्या गावी पोहोचत आहेत. पण शहरी व ग्रामीण भागातील निगरगट्ट प्रशासनाने बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे कोरोनाच्या रूग्णांत वाढ होताना दिसत आहे. जिल्हासह तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रशासनाची धावपळ होताना दिसत आहे. गावखेड्यात बाहेरून घर वापसी झालेल्या मजुरांमुळे आता ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे.
तालुक्यात २५ मार्चपासून आतापर्यंत सहा हजार १९१ नागरिकांनी घर वापसी केली आहे. यातील बºयाच लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर अनेक जण अजूनही रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहे.
स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कोरोना वाढीस अनुकुल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. ८ दिवसांपूर्वी पुणे वरून आलेला मजूर घरी आला याविषयी नगर पंचायतला कळविण्यात आले.
पण नगर पंचायतचे जबाबदार कर्मचारी साधा फोन उचलण्याचीही तसदी घेत नाही.
यावरून येथील नगर पंचायत कोरोना बाबतीत उदासीन असल्याचे दिसते. नगर पंचायत हद्दीत कोरोना विषयक अपडेट देण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे.
पण इथे सर्व टोलवाटोलविची कामे सुरू आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याची जबाबदारी नगर पंचायतची आहे. पण नगर पंचायत स्वत: काहीच करीत नाही आणि कुणी माहिती दिली तर त्याकडेही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला आहे.
गणखैरा येथे अत्यावश्यक सेवाही बंद
तालुक्यातील ग्राम गणखैरा येथे कोरोनाचा रूग्ण मिळाल्याने रस्त्यावर कमालीची शांतता आहे. सोबतच किराणा दुकानही बंद ठेवण्यात आले आहे. गणखैरात चारही बाजूने कडकडीत बंद असून फक्त अतिमहत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना सोडले जात आहे. तर सोबतच ग्राम आंबेतलाव येथे शनिवारी १ रूग्ण मिळाल्याने तेथील १६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. गावात पोलीस चौकी तयार करण्यात आली असून गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहे. किराणा दुकानापासून सर्व काही बंद करण्यात आले असल्याची माहिती सरपंच योगेश चौधरी यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
राबणारे राबतात, बाकीचे नॉटरिचेबल
नगर पंचायतच्या सुस्त धोरणामुळे कोरोना वाढीस वाव मिळत आहे असा आरोप नागरीक करीत आहे. मात्र ग्रामपंचायत कोरोना बाबतीत एक पाऊल पुढे आहेत. गावखेड्यात शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. सध्या शहरात आशा वर्कर आणि एक तलाठी जी.व्ही.गाढवे राबताना दिसत आहेत. २-४ नगरसेवक सोडले तर उर्वरितांचा पत्ता नाही. सुरूवातीला महादान करणारे नगरसेवक गायब झाले आहे. आशा सेविका घरोघरी जाऊन बाहेरून आलेल्यांची माहीती गोळा करीत आहेत.