सावधान ! जिल्ह्यात वाढताहेत कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:00 AM2021-03-13T05:00:00+5:302021-03-13T05:00:47+5:30
१ मार्च ते १२ मार्चच्या दरम्यान १९ हजार ६७१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५१९ जणांना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा शहरातील ३२० रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १ मार्च राेजी २६ रुग्णांची नोंद झाली होती. १० मार्चपर्यंत हा आकडा ५० च्या आत होता. परंतु गुरूवारपासून रुग्णांची संख्या वाढायला लागली. गुरूवारी जिल्ह्यात ६१ रुग्णांची नोंद झाली. तर शुक्रवारी तब्बल ७५ रुग्ण आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात सर्वत्र फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली असताना भंडरा जिल्ह्यात रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र आता मार्च महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. मार्चच्या अवघ्या बारा दिवसात जिल्ह्यात ५१९ रुग्ण आढळून आले असून त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील ३२० रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी तर अलीकडच्या काळातील सर्वाधिक ७५ रुग्णांची नोंद झाली.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाही. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर भंडारा शहरातही लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या सुरूवातीपासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा अपवाद वगळला तर रुग्णांची संख्या वाढली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार १९३ रुग्णांची नोंद झाली आहे.
जानेवारी महिन्यापासून तर कोरोना रुग्णांची संख्या एकदम कमी झाली होती. त्यामुळे सर्व निर्बंध शिथील झाले. नागरिक बिनबोभाटपणे नियमांना पायदळी तुडवत शहरात भटकू लागले. नागपूरसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. ही भंडारा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा होती. परंतु नागरिक त्यानंतरही नियम पाळताना दिसत नव्हते. परिणामी आता हळूहळू का होईना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे.
१ मार्च ते १२ मार्चच्या दरम्यान १९ हजार ६७१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५१९ जणांना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा शहरातील ३२० रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १ मार्च राेजी २६ रुग्णांची नोंद झाली होती. १० मार्चपर्यंत हा आकडा ५० च्या आत होता. परंतु गुरूवारपासून रुग्णांची संख्या वाढायला लागली. गुरूवारी जिल्ह्यात ६१ रुग्णांची नोंद झाली. तर शुक्रवारी तब्बल ७५ रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे सुरूवातीला दीड हजाराच्या आसपास चाचण्या केल्यानंतर सरासरी ५० च्या आत रुग्ण आढळत होते. परंतु शुक्रवारी केवळ ६२१ रुग्णांच्या चाचण्या केल्या असता तब्बल ७५ रुग्ण आढळून आले. ही भंडारा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत आहे. परंतु नागरिक त्या पायदळी तुडवत आहे.
ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ४४६
जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली असताना गत बारा दिवसात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या मात्र वेगाने वाढत आहे. सध्या जिल्ह्यात ४४६ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी कुणीही गंभीर आजारी नसले तरी ॲक्टीव्ह रुग्णांची वाढती संख्या धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टीव्ह रुग्ण भंडारा तालुक्यात २६९ आहेत. मोहाडीत १८, तुमसर ६१, पवनी २७, लाखनी ४१, साकोली २७ आणि लाखांदूरमध्ये अवघे तीन रुग्ण आहेत.
मार्च महिन्यात केवळ एक मृत्यू
भंडारा जिल्ह्यात रुग्णांच्या मृत्यूचा दर सुरूवातीपासूनच अल्प आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात केवळ भंडारा तालुक्यातील एका वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाला. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर २.३१ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर ९४.५५ टक्के आहे.