सावधान! न्यायालयाचा परस्पर येऊ शकतो समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:03 PM2019-01-04T22:03:25+5:302019-01-04T22:05:53+5:30
दुचाकी चालविताना हेल्मेट घालत नसाल तर सावधान! तुम्हालाही परस्पर न्यायालयाचा समन्स येऊ शकतो. हेल्मेट न वापरणाऱ्या स्वारांच्या दुचाकीचा परस्पर क्रमांक नोंदवून न्यायालयात केस दाखल करण्याचा सपाटा पोलीस दलाने लावला आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट घालाच अन्यथा तुम्हालाही न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागू शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दुचाकी चालविताना हेल्मेट घालत नसाल तर सावधान! तुम्हालाही परस्पर न्यायालयाचा समन्स येऊ शकतो. हेल्मेट न वापरणाऱ्या स्वारांच्या दुचाकीचा परस्पर क्रमांक नोंदवून न्यायालयात केस दाखल करण्याचा सपाटा पोलीस दलाने लावला आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट घालाच अन्यथा तुम्हालाही न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागू शकते.
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सक्ती करण्यात आली आहे. सुरूवातीला चौकाचौकात पोलिसांनी दुचाकीस्वारांवर कारवाईचा सपाटा लावला. मात्र अलिकडच्या काळात पोलीस कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे विना हेल्मेटची दुचाकी चालविताना दिसतात. मात्र पोलिसांचा डोळा तुमच्यावर आहे. हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांना वाहतूक पोलीस काहीही बोलणार नाही. मात्र त्यांच्या दुचाकीचा परस्पर क्रमांक नोंदवून घेतील. त्यानंतर आरटीओकडून त्याचा तपशील घेवून दुचाकीस्वाराविरूद्ध थेट न्यायालयात केस दाखल करतील. भंडारा शहरात या प्रकाराला सुरूवात झाली आहे.
पोलिसांनी ही परस्पर कारवाई करण्याचा निर्णय नागरिकांसोबत होणारा संघर्ष टाळण्यासाठी घेतला आहे. हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध पोलीस कारवाई करण्यास गेले की त्यांच्यावर दबाव आणला जातो. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी हेल्मेट सक्तीविरोधात आवाज उठविला आहे. प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती शिथिल झाल्याचा गैरसमज नागरिकात निर्माण झाला. मात्र नागरिकांसोबत होणारा संघर्ष टाळण्यासाठी आता पोलिसांनी परस्पर प्रकरण न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गत आठवडाभरापासून वाहतूक नियंत्रण शाखेच्या मोबाईल व्हॅनद्वारे ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना याबाबतची माहिती दिली जात आहे. तसेच हेल्मेट वापरण्याची सुचनाही केली जात आहे.
नगरपरिषद क्षेत्रातही हेल्मेट सक्ती
महाराष्ट्र शासनाने २० आॅगस्ट २००३ रोजी अधिसूचना काढून महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्र हेल्मेट सक्तीतून वगळले होते. मात्र त्यानंतर उच्च न्यायालय व सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने १७ जानेवारी २००५ रोजी पुन्हा अधिसुचना जारी केली. त्यानुसार राज्यात त्या सर्वच क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. परिणामी भंडारा शहरातही हेल्मेट सक्ती असून यात कोणतीही शिथिलता दिली नसल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण गाडे यांनी कळविले आहे.
१३८५ दुचाकीस्वारांवर कारवाई
भंडारा जिल्ह्यात हेल्मेट सक्ती लागू झाली तेव्हापासून एक हजार ३८५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सहा लाख ९२ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले आहे.