सावधान! काेराेना गेला या भ्रमात राहू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:42 AM2021-02-17T04:42:17+5:302021-02-17T04:42:17+5:30
भंडारा : गत महिन्याभरापासून काेराेना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली हाेती. नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत फिरताना दिसत हाेते. ...
भंडारा : गत महिन्याभरापासून काेराेना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली हाेती. नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत फिरताना दिसत हाेते. मात्र, विदर्भात पुन्हा काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असून, भंडारा जिल्ह्यातही गत तीन दिवसांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. फेब्रुवारीच्या दाेन आठवड्यांत १८३ रुग्णांची नाेंद झाली. त्यामुळे नागरिकांनी काेराेना गेला या भ्रमात न राहता खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.
विदर्भासह राज्यात काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत आहे. भंडारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काेराेना रुग्णांची संख्या कमी असली, तरी गत तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. ९ फेब्रुवारी राेजी तीन, १० फेब्रुवारी राेजी सहा, ११ फेब्रुवारी राेजी सात असे रुग्ण आढळले हाेते; परंतु १४ फेब्रुवारी राेजी १९, १५ फेब्रुवारी १० आणि मंगळवार १६ फेब्रुवारी राेजी २१ रुग्ण वाढले आहेत. रुग्णवाढ वेगाने हाेत असल्याचे यावरून दिसत आहे. मात्र, नागरिक जिल्ह्यातून काेराेना संपला या भ्रमात आहे. कुठेही नियमांचे पालन हाेत नाही. मास्क लावला जात नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेत नाही. जणू भंडारा शहरातून काेराेनाचे निर्मूलन झाले अशी स्थिती आहे. नागरिक असेच बेजबाबदारपणे वागले तर जिल्ह्यात पुन्हा काेराेनाचा उद्रेक हाेण्याचा धोका नाकारता येत नाही.
बाॅक्स
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांशी दृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील काेराेना रुग्णांच्या स्थितीची माहिती जाणून घेतली. भंडारा जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.
बाॅक्स
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई
काेराेना गेला असा समज करून काही नागरिक फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करीत नाहीत. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बाॅक्स
मंगळवारी २१ नवे रुग्ण
भंडारा जिल्ह्यात मंगळवारी ५६४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यातील १२, माेहाडी ४, तुमसर २, लाखनी १ आणि साकाेली तालुक्यात २ असे २१ रुग्ण आढळून आले. १५ जणांनी काेराेनावर यशस्वी मात केली असून, सध्या १०३ काेराेना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी जिल्ह्यात कुणाचाही मृत्यू झाला नाही. काेराेना बळींची संख्या ३२६ झाली आहे.
काेट
जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या परत वाढायला लागली आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाकडून अँटिजेन व काेराेना तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी भीती न बाळगता वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
- संदीप कदम,
जिल्हाधिकारी, भंडारा