सावधान! सिंगल यूज प्लास्टिक वापराल, तर पाच हजार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 03:45 PM2021-11-18T15:45:08+5:302021-11-18T15:48:40+5:30
भंडारा नगर परिषदेच्या वतीने मोहीम राबवून सुरुवातीला व्यावसायिकांना प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास पहिल्या गुन्ह्यात ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
भंडारा : पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनासंसर्गात प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, आता सावधान, सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू वापरत असाल, तर थेट पाच हजार रुपये दंड नगर परिषद ठोठावणार आहे. लवकरच भंडारा शहरात प्लास्टिकविरोधी मोहीम राबविली जाणार आहे.
भंडारा शहरासह जिल्ह्यात व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर वस्तू देण्यासाठी करतात, तसेच सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र, हा प्रकार पर्यावरणासाठी धोक्याचा आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रुल्स लागू केला आहे, तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अविघटनशील कचऱ्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर अनिष्ट परिणाम होत असल्याने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविटनशील वस्तूंची हाताळणी अधिनियम संपूर्ण राज्यात लागू केला आहे. त्यानुसार आता याची अंमलबजावणी भंडारा नगर परिषदेच्या क्षेत्रात केली जाणार आहे.
भंडारा नगर परिषदेच्या वतीने मोहीम राबवून सुरुवातीला व्यावसायिकांना सूचना देण्यात येणार आहेत. प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरण्याची त्यांना सक्ती केली जाणार आहे. मात्र, त्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास पहिल्या गुन्ह्यात पाच हजार रुपये दंड, दुसऱ्या गुन्ह्यात दहा हजार रुपये दंड आणि त्याच व्यक्तीने तिसरा गुन्हा केल्यास १५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे. लवकरच भंडारा शहरात मोहीम सुरू होणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
या आहेत प्रतिबंधित प्लास्टीकच्या वस्तू
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार सजावटीसाठीचे प्लास्टीक, मिठाईचे बाॅक्स, आमंत्रण कार्ड, प्लास्टिकचे झेंडे, आइस्क्रीम कांड्या, प्लेटस, काटे, चमचे, चाकू, स्ट्राॅ, प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण आदींवर प्रतिबंध आहे. मात्र, त्यानंतरही त्याचा वापर होत असल्याने पर्यावरणास हानी होण्याची शक्यता आहे. या वस्तू नागरिकांनी वापरू नयेत, असे आवाहन केले आहे.
कॅरिबॅगला बंदी
सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरिबॅगला) प्रतिबंध आहे. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांतून किराणासह भाजीपाला आणि इतर साहित्य दिले जाते. या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या जातात. शहरात ठिकठिकाणी असे प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आढळून येते.
स्वच्छ व सुंदर भंडारा शहरासाठी नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांनी शक्यतो प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा. शक्य नसेल तर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवावा. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
-विनोद जाधव, मुख्याधिकारी