सावधान ! काेराेना रुग्ण वाढू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 05:00 AM2021-10-23T05:00:00+5:302021-10-23T05:00:48+5:30
प्रशासन काेराेना रुग्णसंख्या कमी झाली तर काेराेना संपला नाही, असे बजावून सांगत असतानाही कुणी नियमांचे पालन करताना दिसत नाही. महिन्याभरापासून तर अनेकांच्या चेहऱ्यावरील मास्कही बेपत्ता झाला आहे. कुणी सॅनिटायझर लावत नाही की, कुणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाही. गतवर्षीही दिवाळीनंतर काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला हाेता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दिवाळीत झालेली गर्दी हाेय. पुन्हा तीच स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल हाेताच बाजारात गर्दी वाढली. दिवाळीच्या खरेदीसाठी तर आतापासूनच बाजारपेठ फुलून गेली आहे. मात्र, खरेदी करताना सावधान! गत दाेन दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जिल्हा काेराेनामुक्त हाेताच सलग दाेन दिवसांपासून तीन रुग्ण आढळून आले आहेत.
काेराेना संसर्गाची लाट ओसरल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. गत महिन्याभरापासून तर बाेटावर माेजण्याइतके रुग्ण आढळत हाेते. महिन्याभरात २५ दिवस कुठेही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे नागरिक निर्धास्त झाले. दिवाळीच्या खरेदीच्या नावाखाली बाजारपेठेत गर्दी करू लागले.
प्रशासन काेराेना रुग्णसंख्या कमी झाली तर काेराेना संपला नाही, असे बजावून सांगत असतानाही कुणी नियमांचे पालन करताना दिसत नाही. महिन्याभरापासून तर अनेकांच्या चेहऱ्यावरील मास्कही बेपत्ता झाला आहे. कुणी सॅनिटायझर लावत नाही की, कुणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाही.
गतवर्षीही दिवाळीनंतर काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला हाेता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दिवाळीत झालेली गर्दी हाेय. पुन्हा तीच स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे.
२० ऑक्टाेबर राेजी भंडारा जिल्हा काेराेनामुक्त झाला हाेता. विशेष म्हणजे त्याच दिवशी जिल्ह्याने ९० टक्के लसीकरण पूर्ण करून राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला हाेता. ही सर्वांसाठी दिलासादायक बाब ठरली हाेती. मात्र, दुसऱ्याच दिवशी लाखनी तालुक्यात दाेन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर शुक्रवारी पुन्हा त्याच तालुक्यात एक पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे.
जिल्हा प्रशासन वारंवार नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक माेठी गर्दी करीत असल्याचे चित्र भंडारा शहरासह सर्वच ठिकाणी दिसत आहे.
आता तर सर्व निर्बंध उठल्याने कुणी कारवाई करायलाही पुढे येत नाही. याचाच परिणाम काेराेना रुग्ण वाढीवर हाेणार तर नाही ना? अशी चिंता प्रशासनाला सतावत आहे.
जिल्ह्यात काेराेना लसीकरण वेगात सुरू आहे. उद्दिष्टाच्या ९० टक्के लसीकरण झाले असून दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने काेराेना लसीकरणासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत असून, ठिकठिकाणी लसीकरण शिबिर आयाेजित केले जात आहे. लसीकरणासाेबतच नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ताेंडावरील मास्क झाले बेपत्ता
- काेराेना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा भीषण अनुभव पाठीशी असतानाही आता अनेकांच्या ताेंडावरील मास्क बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे. काहीजण तर केवळ हनुवटीला मास्क लावून ठेवतात. कुणी म्हटले की ताे मास्क नाकावर चढविला जाताे. परंतु सर्वच आता बिनधास्त झाले असून यातूनच काेराेना रुग्ण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
तीन ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात सध्या स्थितीत तीन ॲक्टीव्ह रुग्ण असून तीनही रुग्ण लाखनी तालुक्यातील आहे. गुरुवारी दाेन आणि शुक्रवारी एक असे तीन रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजार ९९ व्यक्तींना काेराेनाची बाधा झाली असून त्यापैकी ५८ हजार ९६३ व्यक्ती काेराेनामुक्त झाले. तर ११३३ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.