ऑनलाईन खरेदी करा पण जरा जपून, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 10:59 AM2021-09-20T10:59:51+5:302021-09-20T11:02:06+5:30
सध्या ऑनलाइन शॉपवरून खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होतांना दिसते. ऑनलाईन खरेदी ग्राहकांसाठी जितकी सुखकर आणि सोयीची आहे. परंतु अशाप्रकारे खरेदी करताना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
भंडारा : कोरोनानंतर सर्वत्र ऑनलाईन व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेकांचा घरबसल्याच ऑनलाईनच खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. गणेशोत्सव तसेच आगामी दुर्गा उत्सवासाठी ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी विविध कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची प्रलोभने दिली जातात. याच संधीचा फायदा घेत मोबाईलवर लिंक पाठवून ऑनलाईन खरेदीच्या नावावर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे.
ऑनलाईन खरेदी करताना प्रत्येकाने सावधानता बाळगण्याची गरज आहे. ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वस्तूची खरेदी केल्यानंतर त्याच्या मोबाईलवर लिंक पाठवली जाते. लिंक डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळेल असे खोटे संदेशही काही प्रसंगी पाठवले जातात, पण नागरिकांनी अशा प्रलोभनांना बळी न पडता अज्ञात वेबसाइटवरून पाठवण्यात आलेल्या लिंक डाऊनलोड करू नयेत, अशा लिंक डाऊनलोड करताच बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी दिवसेंदिवस नवनवीन युक्त्या शोधून काढत असतात. त्यासाठी अनेकदा महिलांना तुमच्या घरी ऑनलाईन पार्सल येत आहे. आता तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तुमचे बँकेत केवायसी नाही, तुमचा आधार नंबर सांगा, ओटीपी सांगा, मोबाईल नंबर सांगा असे फोन करून माहिती मागण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेकांना तर थेट लाखो रुपयांची लॉटरी लागली आहेत असे संदेश पाठवले आहेत, तर अनेकांना लॉटरी लागल्याचे फोन कॉलही येत आहेत. मात्र, नागरिकांनी सजग राहून अशा प्रकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.
यासोबतच भंडारालगतच्या बेला येथील एका ग्राहकाला अशाचप्रकारे फसवल्याचे समोर आले आहे. सायबर गुन्हेगार नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी विविध प्रकारच्या योजनांच्या ऑफर देतात. त्यानंतर ओटीपी पाठवला जातो. फोन करून ओटीपीचा नंबर मागितला जातो. तुम्हाला लॉटरी लागली आहे; परंतु आधी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर सांगा. तुमच्या खात्यावर बँकेत रक्कम जमा होईल अशा प्रकारच्या भूलथापा दिल्या जातात.
अशी होऊ शकते फसवणूक....
ऑनलाईन पद्धतीने वस्तूंची खरेदी करताना अनोळखी संकेतस्थळावरून विविध लिंक मोबाईलवरून डाउनलोड केल्यानंतर चांगल्या कॅशबॅकच्या ऑफरचा संदेश पाठवला जातो, पण लिंक डाउनलोड करताच ग्राहकांच्या थेट बँक खात्यातील सर्व रक्कम कमी झाल्याचे संदेश आल्यावरच समजते. सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरू असल्याने नागरिकांना लॉटरी लागल्याचे संदेश पाठवले जात आहेत. लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी टप्प्याटप्प्याने ओटीपी व काहीजणांकडे पैसे मागितले जातात. मात्र, या संदेशाकडे दुर्लक्ष करणेच योग्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
अशी घ्या काळजी...
एखादी वस्तू खरेदी करताना त्या कंपनीच्या वेबसाईटची खातरजमा करावी. आपली वैयक्तिक माहिती अथवा ओटीपी नंबर, आधारकार्ड नंबर, मोबाईल नंबर कुणालाही देऊ नये. अनेकदा महिलांना फोन करून बँक खाते, एटीएम, मोबाईल नंबर मागितले जातात. मात्र, असे फोन आल्यास घरातील महिलांसह सर्वांनीच सजग राहणे गरजेचे आहे. बँक कधीही ग्राहकांना कधीही फोन करून माहिती विचारत नाही.
बॉक्स
एका पत्रकारालाच २५ लाखांच्या लॉटरीचा संदेश
भंडारा शहरातील एका पत्रकाराला थेट २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा संदेश आला होता. यावेळी तत्काळ पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. शहरासह जिल्ह्यात अनेकांना लॉटरी लागल्याचे कॉल, तसेच अशा प्रकारचे संदेश पाठवून दिशाभूल केली जात आहे. मात्र, कुणीही अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका.