खेळभावना जोपासून प्रत्येकांनी यश मिळवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:39 PM2017-12-05T23:39:38+5:302017-12-05T23:40:00+5:30
मैदानी खेळ म्हटले की, जय पराजय आलाच. मात्र विजय मिळविण्यासाठी सर्वांनी खेळभावना दाखवित यश मिळवावे. चुकीच्या पद्धतीने मिळविलेले यश चिरकाल टिकत नाही.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : मैदानी खेळ म्हटले की, जय पराजय आलाच. मात्र विजय मिळविण्यासाठी सर्वांनी खेळभावना दाखवित यश मिळवावे. चुकीच्या पद्धतीने मिळविलेले यश चिरकाल टिकत नाही. त्यामुळे सर्वांनी संघहित व खेळाची प्रतिमा जोपासून नैसर्गिक खेळ करावा, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर यांनी व्यक्त केले.
येथील छत्रपती शिवाजी जिल्हा क्रीडा संकुलावर दोन दिवसीय दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या, या स्पर्धांच्या बक्षिस वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जि. प. सदस्य तथा समाजकल्याण समिती सदस्य नेपाल रंगारी, मुख्य लेखाधिकारी अशोक मातकर, समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, दिवाकर रोकडे, राम केजरीवाल, आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू योगेश घाटबांधे, सर्व दिव्यांग शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक उपस्थित होते.
ठवकर यांनी, दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजातील प्रत्येक घटकांनी बदलवून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. यावेळी नेपाल रंगारी यांनी, दिव्यांगांना निधीची कमी पडू देणार नाही. सभागृहात निधीची मागणी रेटून लावू धरू असे प्रतिपादन केले.
क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेदरम्यान जिंकून आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय झिंगरे यांनी केले. संचालन संजय माळवी यांनी केले. तर आभार विनोद उमप यांनी मानले.
यांना मिळाले बक्षीस
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अस्थिव्यंग प्रवर्गात प्रथम क्रमांक तुमसरची अपंग निवासी विद्यालय, अंधप्रवर्गातील प्रथम क्रमांक भंडारा येथील शासकीय अंध विद्यालय, कर्णबधीर प्रवर्गात प्रथम क्रमांक तुमसरच्या श्रीमती जानकी माधव व डुंभरे कर्णबधिर विद्यालय, मतिमंद प्रवर्गात प्रथम क्रमांक भंडारा येथील जनचेतना मतिमंद विद्यालय यांना देणयात आले.