प्रतिसाद देणारे विद्यार्थी घडविण्यास सज्ज व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:23+5:302021-06-11T04:24:23+5:30
गिरीश कुलकर्णी : राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची आभासी सभा शहापूर : बदलत्या शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना प्राध्यापक, ...
गिरीश कुलकर्णी : राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची आभासी सभा
शहापूर : बदलत्या शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना प्राध्यापक, शिक्षक यांनी वर्गातील चार भिंतींच्या आड दिले जाणारे पारंपरिक पुस्तकी शिक्षण यांच्या बाहेर पडून समाजात दैनंदिन घडणाऱ्या घटना, चळवळी यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. त्यावर केवळ प्रतिक्रिया देणारे विद्यार्थी तयार करण्यापेक्षा त्या घटनांना प्रतिसाद देणारे विद्यार्थी घडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन अहमदनगर स्नेहालय सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. ९ जून रोजी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या समारोहात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार तर अतिथी म्हणून मराठी व हिंदी विषयाचे प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. मनोहर हे होते. राज्यशास्त्र विषयाच्या शिक्षकांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता आता संशोधनाकडे वळावे. स्वतःबरोबरीने विद्यार्थ्यांमध्येसुद्धा संशोधक वृत्ती निर्माण करावी आणि त्याकरिता राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेने एक स्वतंत्र संशोधक अभ्यास गट तयार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कोरोनामुळे एकीकडे शाळा बंद, पण शिक्षण सुरू अशी परिस्थिती तर दुसऱ्या बाजूला शंभर टक्के बदललेला राज्यशास्त्र विषयाचा अभासक्रम, अशा दुहेरी चक्रात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक सापडले आहेत. अशा प्रसंगी प्रा. पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची स्थापना झाली. या काळात परिषदेच्या वतीने वर्ग बारावी राज्यशास्त्र विषयाचे दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ, ऑनलाइन टेस्ट, नोट्स, प्रश्नपेढी, प्रश्नसंच, ऑडिओ क्लिप, इत्यादी तयार करून ते परिषदेच्या माध्यमातून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पोहोचविण्यात परिषद यशस्वी झाली. मागील वर्षभरातील राज्यशास्त्र परिषदेच्या संघटनात्मक, शैक्षणिक आणि संस्कृतिक कार्याचा आढावा एका ध्वनिचित्रफितीमार्फत या प्रसंगी घेण्यात आला.
राज्यशास्त्र परिषदेचे राज्यसचिव प्रा. डॉ. पितांबर उरकुडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून राज्यशास्त्र परिषदेच्या तंत्रस्नेही प्राध्यापकांच्या कार्याचा गौरव केला. कोविड काळात दिवंगत झालेले कार्याध्यक्ष स्व. प्रा. भगवान चौधरी आणि इतर राज्यशास्त्र प्राध्यापकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रा. निशिगंधा जाधव यांनी संचालन केले. खुशी आणि ख्याती मानमोडे या चिमुकल्यांनी स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. सुनीता जमणे यांनी करून दिला. ध्वनिचित्रफितीचे ऑडिओ रूपांतरण प्रा. हर्षदा दरेकर यांनी तर आभार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. शरद जोगी यांनी केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू प्रा. राम बागुल व प्रा. गिरीश लोंढे यांनी सांभाळली. या प्रसंगी राज्यशास्त्र परिषदेचे प्रा. सुरेश नारायणे, प्रा. स्मिता जयकर, प्रा. सुनील राठोड, प्रा. प्रमोद करमोरे, प्रा. धनंजय किंबहुने, प्रा. विजय बर्गे, प्रा. राजेंद्र इंगळे, प्रा. वैशाली देशपांडे, प्रा. जयश्री कळसकर, प्रा. ज्योती गावंडे, प्रा. अविनाश यामगर, प्रा. दत्ता जाधव व प्राध्यापक उपस्थित होते.
बॉक्स
अन्य जिल्ह्यांचा समावेश
राज्यातील शैक्षणिक विभाग म्हणजे नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, मुंबई आणि कोकण या नऊही विभागांत परिषदेच्या विभाग कार्यकारिणी आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यांत परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्या आहेत. आगामी काळात परिषदेमार्फत संशोधन क्षेत्र, नेट सेट परीक्षा मार्गदर्शन केंद्र निर्माण करण्याचा मानस राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार यांनी केला. या प्रसंगी त्यांनी राज्य कार्यकारिणीत काही संघटनात्मक बदलांची घोषणा केली .