कौशलयुक्त जिल्हा व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 10:26 PM2018-01-07T22:26:15+5:302018-01-07T22:27:04+5:30

महाराष्ट्र शासनाने दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने राज्यातील तरुण तरुणींना कौशल्य प्रशिक्षण प्रमाणात दिले आहे.

Be a well-formed district | कौशलयुक्त जिल्हा व्हावा

कौशलयुक्त जिल्हा व्हावा

Next
ठळक मुद्देरणजित पाटील : मोहाडीत कौशल्य विकास रोजगार मेळावा

आॅनलाईन लोकमत
भंडारा : महाराष्ट्र शासनाने दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने राज्यातील तरुण तरुणींना कौशल्य प्रशिक्षण प्रमाणात दिले आहे. जिल्ह्यामध्ये स्वयंरोजगाराला वाव असून भंडारा जिल्हा कौशलयुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.
कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, भंडारा यांच्या वतीने मोहाडी येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी हे होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मोहाडी नगराध्यक्ष स्वाती लिमजे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक संचालक शैलेश भगत व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
ना.रणजित पाटील यांनी, जगातील इतर देशाच्या तुलनेत भारताकडे मानव संसाधन अधिक आहे. हे संसाधन कौशल्ययुक्त झाल्यास देश अधिक प्रगत होईल. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात प्रथमच कौशल्य विकास हे मंत्रालय सुरु केले. महाराष्ट्रात या मंत्रालयांतर्गत प्रशिक्षणाची योजना राबविली जात आहे. शिक्षणासोबतच प्रशिक्षण आवश्यक असून युवक - युवतींनी आपल्यामधील गुण व कौशल्य ओळखून त्यानुसार क्षेत्र निवडावे. केवळ नौकरीच्या मागे न धावता कौशल्याच्या बळावर स्वत:चा रोजगार स्वत: निर्माण करा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
शासनाचा कौशल्य प्रशिक्षणावर मोठा भर असून व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना कौशल्य प्रशिक्षणाचा विशेष अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. मोहाडी नगर पंचायतने स्वच्छतेत चांगले कार्य करावे असे सांगून पाटील म्हणाले की, मोहाडीच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. शासन निधी देईल. मात्र हा आराखडा सर्वंकश असावा.
यावेळी बोलताना आमदार चरण वाघमारे यांनी, युवकांनी केवळ नौकरीच्या मागे न धावता रोजगार करण्यावर भर द्यावा. स्वत:च्या रोजगाराच्या संधी स्वत: निर्माण कराव्यात. या मेळाव्यात नौकरीची हमी न मिळाल्याने नाराज न होता स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा घेऊन जावे असे ते म्हणाले. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७००-८०० लोकांनी रक्तदान केले असून या क्षेत्रात ‘ब्लड आॅन कॉल’ योजना यशस्वी होत आहे. हा मेळावा युवकांनी स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणारा ठरेल असे ते म्हणाले.
भंडारा जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असून यावर आधारीत जिल्ह्याच्या विकासाचे व्हीजन प्रशासनाने तयार केल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. कृषी, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग व पशुसंवर्धन हा पंचसुत्री कार्यक्रम प्रशासन राबविणार आहे. या पंचसुत्रीमधून रोजगारांच्या अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच पर्यटनाला वाव दिला जाणार असून युवकांनी या माध्यमातून रोजगारक्षम व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिवसे यांनी केले.
यावेळी तारिक कुरैशी व प्रकाश बाळबुद्धे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अनुराधा पॅरामेडीकलच्या विद्यार्थिनींचा ना.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक शैलेश भगत यांनी केले. जिल्ह्यात सहा रोजगार मेळावे घेवून ग्रामीण भागातील दीड हजार विद्यार्थ्यांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात विविध कंपन्यांनी आपले स्टॉल लावले होते. या मेळाव्यास युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चरण वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे हस्ते करण्यात आले.

Web Title: Be a well-formed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.