मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती चिंताजनक, भंडारातील ढिवरवाडाची घटना
By युवराज गोमास | Published: August 21, 2022 01:49 PM2022-08-21T13:49:18+5:302022-08-21T13:49:30+5:30
नागपूर येथे उपचारासाठी रवाना
भंडारा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर अस्वलाचा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्यालगत ढिवरवाडा ते मांडवी दरम्यान रविवारी सकाळी ८.३० वाजता घडली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर व पायांवर खोलवर इजा झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.
तुकाराम हिंगे (६५) रा. ढिवरवाडा असे जखमीचे नाव आहे. रविवारी सकाळी ते नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला ढिवरवाडा ते मांडवी रस्त्यावर गेले होते. यावेळी अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र परिसरात कुणीच नसल्याने ते रस्त्यावर पडून होते.
काही वेळानंतर या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाला. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सरपंच धामदेव वनवे यांनी घटनेची माहिती कोका वन्यजीव अभयारण्यातील अधिकारी तसेच तुमसर वनाधिकाऱ्यांना दिली.
मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना भंडारा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. दरम्यान कोका अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी माकडे यांनी रूग्णालयात धाव घेतली. डाॅक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. मात्र, प्रकृती चिंताजनक दिसून येताच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यास नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.