जादूटोण्याच्या संशयावरून घरात शिरुन मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 04:11 PM2024-07-09T16:11:01+5:302024-07-09T16:12:17+5:30
८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल : साहित्याची केली तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर: मागील ३-४ वर्षांपासून आजारी असलेल्या पत्नीवर जादूटोणा केल्याचा संशय घेऊन गावातीलच एका व्यक्तीच्या घरात प्रवेश करून मारहाण केल्याची आणि साहित्याची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जुलैच्या रात्री ७ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मासळ येथे घडली.
या प्रकरणी माधुरी ताराचंद सोनटक्के (५८) या महिलेच्या तक्रारीवरून शंकर उरकुडा सोनटक्के (५०), गोपाल शंकर सोनटक्के (२१), चक्रधर शंकर सोनटक्के (२०), वंदना सोनटक्के (४५), लाखनी येथील जागेश्वर शेंडे (३५), अन्नपूर्णा जागेश्वर शेंडे (२४), मुरमाडी (तूपकर) येथील जयलक्ष्मी मेश्राम (२४) व पवनी येथील गंगासागर (२२) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम १८९ (२), १९१ (२), ३३३, ११५ (२), ३५२ व कलम ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रानुसार, माधुरी ताराचंद सोनटक्के (५८) या महिलेच्या कुटुंबीयांचा मागील ५ वर्षांपासून गावातीलच शंकर सोनटक्के व कुटुंबीयांसोबत जमिनीवरून वाद झाला होता. यात वादामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये संवाद बंद होता. शंकर यांची पत्नी मागील ३-४ वर्षांपासून अज्ञात आजाराने पीडित होती. औषधोपचार करून देखील पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आरोपींनी ताराचंद सोनटक्के याने आपल्या पत्नीवर जादूटोणा केल्याचा संशय घेतला. तक्रारकर्ती महिला पतीसह आपल्या घरी असताना ६ जुलैच्या सायंकाळी शंकर सोनटक्के याच्या सह अन्य आठ जणांनी घरात प्रवेश करून हल्ला केला. भांडणात त्यांनी महिलेच्या घरातील उपयोगी साहित्याची नासधूस देखील केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे करीत आहेत.