ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचे सौंदर्य खुलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 06:00 AM2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : निसर्गाने मुक्त हस्त उधळण केलेल्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास जलद गतीने होणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : निसर्गाने मुक्त हस्त उधळण केलेल्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास जलद गतीने होणार असून या परिसरात हिल स्टेशन साकारले जाणार आहे. विश्रामगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून अन्य विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे पर्यटकांचा ओघ वाढणार असून परिसरात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्याचे नंदनवन म्हणून ग्रीन व्हॅली चांदपूरची ओळख आहे. या पर्यटनस्थळाच्या विकासाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने विकासकामांसाठी २००० मध्येच मंजूरी दिली. आॅगस्ट २०१२ पर्यंत सुरळीत सुरु असताना या पर्यटनस्थळाला नंतर उतरती कळा लागली. त्यानंतर कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आली नाही. यात तीन ते चार वर्षांचा कालावधी निघून गेला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले. राज्य शासनाच्या यंत्रणेवर दबाव निर्माण करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याकडे प्रयत्न करण्यात आले. महामंडळांतर्गत पर्यटनस्थळ विकास कार्यांना गती देण्यात आली. प्रथम टप्प्यात १ कोटी ८५ लाख रुपये खर्चून विश्रामगृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. इतर विकास कामांनाही गती दिली जाणार आहे. त्यात चांदपूर जलाशयात नौका विहार आणि जलक्रीडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रदर्शन केंद्र, मनोरंजन पार्क, हस्तकला केंद्राची उभारणी, रोपे आदी सुविधा येथे दिली जाणार आहेत. पर्यटनस्थळ संचालनाचे अधिकार देताना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नियमांना अधिन राहून करारबद्ध करण्यात येणार आहे. या पर्यटनस्थळाच्या विकासामुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. परिसरातील अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या असून काही वर्षातच नंदनवन आणखी खुलणार आहे.
नौकानयनाची मंजुरी आवश्यक
चांदपूर जलाशयात तात्पुरत्या स्वरुपात नौकानयनाची मंजुरी देण्याची गरज आहे. याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती चांदपूर येथील मत्स्यपालन संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे यांनी सांगितले. यामुळे पर्यटक चांदपूरकडे आकर्षित होतील, तर सामाजिक कार्यकर्ते किशोर राहांगडाले म्हणाले, चांदपूर गावात देवस्थान, ऋषीमुनी आश्रम, चांदशाहवली दर्गा आहे. या संपूर्ण परिसराचा विकास केल्यास रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल. त्या दिशेने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना आवश्यक आहेत.