खेळण्या-बागडण्याच्या वयात साहिल खिळला अंथरूणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 09:48 PM2018-11-21T21:48:37+5:302018-11-21T21:48:59+5:30
खेळण्या बागडण्याच्या वयात साहिलला स्नायूंचा दुर्मिळ आजार झाला. वडिलांनी शक्य तेवढे उपचार केले. मुंबईत शस्त्रक्रिया केली. यावर चार ते पाच लाख रुपये खर्चही झाले. मात्र वेदनातून साहिलची सुटका झाली नाही. आता १४ वर्षीय साहिल अंथरुणाला खिळून असून आरोग्य विम्याचाही उपयोग शून्य आहे. अशा या बालकाला आता समाजाकडूनच मदतीची आस आहे.
तथागत मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : खेळण्या बागडण्याच्या वयात साहिलला स्नायूंचा दुर्मिळ आजार झाला. वडिलांनी शक्य तेवढे उपचार केले. मुंबईत शस्त्रक्रिया केली. यावर चार ते पाच लाख रुपये खर्चही झाले. मात्र वेदनातून साहिलची सुटका झाली नाही. आता १४ वर्षीय साहिल अंथरुणाला खिळून असून आरोग्य विम्याचाही उपयोग शून्य आहे. अशा या बालकाला आता समाजाकडूनच मदतीची आस आहे.
साहिल रामलाल गणवीर असे या बालकाचे नाव आहे. सात वर्षाचा असताना त्याच्या प्रकृतीत अचानक बदल दिसायला लागला. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करूनही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे नागपूर येथील अस्थिरोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी तेथे त्याला स्नायूचा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले. साहिलचे वडील रामलाल सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कर्मचारी आहेत. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी साहिलच्या उपचारात कुठेही कमी पडू दिले नाही. परंतु या दुर्मिळ आजारावर हवे तसे उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे साहिलचे शरीर कमजोर झाले. स्नायूत रक्तपेशी दाटल्याने खेळणारा साहिल अंथरुणाला खिळला.
पाच महिन्यापूर्वी साहिलवर मुंबई येथील खासगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावर चार ते पाच लाख रुपये खर्च झाले. उधार, उसणवार करून त्यांनी ही शस्त्रक्रिया केली. आता पुन्हा मुंबईला उपचारासाठी न्यायचे आहे. पुन्हा चार ते पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याही उपचाराने तो बरा होईल असे कुणी सांगत नाही. परंतु असह्य वेदना कमी होतील. त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही अशी आस आहे. कमावलेले पैसे उपचारात गेले. कंत्राटी कामगार पाच लाख रुपयांची व्यवस्था करणार तरी कशी. यासाठी समाजातील दानशूर दात्यांनी पुढे यावे आणि साहिलला वेदनेतून मुक्त करावे अशी अपेक्षा आहे.
आरोग्य विमा कुचकामी
रामलाल गणवीर यांनी आपल्या तुटपुंज्या वेतनातून आरोग्य विमा काढला. दरवर्षी त्यांच्या खात्यातून ३३७५ रुपये कापले जातात. आपल्या कुटुंबाची यातून आरोग्याची तरतूद होईल अशी अपेक्षा होती. परंतु आता साहिलच्या आरोग्यासाठी होणारा खर्च देण्यास विमा कंपनीने नकार दिल्याचे रामलाल यांनी सांगितले. आमदारापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत आवश्यक कागदपत्रे गोळा करूनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.