लाभार्थ्यांना वयाचा पुरावा ठरतोय गौण
By admin | Published: December 27, 2014 01:11 AM2014-12-27T01:11:37+5:302014-12-27T01:11:37+5:30
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ वृद्धपकाळ या योजनांची शासनाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य अंमलबजावणी केली जात नाही.
भंडारा : संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ वृद्धपकाळ या योजनांची शासनाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य अंमलबजावणी केली जात नाही. परिणामी अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत.
श्रावणबाळ वृद्धपकाळ या योजनेसाठी वृद्ध लाभार्थी हे ६५ वर्षे वयाचे असावे, अशी अट आहे. त्या संबंधी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या अटीला धरुन आजपर्यंत जिल्हयातील सातही तहसील कार्यालयातून प्रकरणे मंजुर झाली. मात्र आता वैद्यकीय अधिकाऱ्याचे ६५ वर्षे वयाचे प्रमाणपत्र असतानासुद्धा केवळ राशनकार्डवरील व मतदान ओळखपत्रावरील वय चुकीचे असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर होत आहेत.
शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा पुरावा गौण ठरत आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी वृद्ध व अशिक्षित असल्याने बहुतेक जणांना स्वत:ची जन्मतारीख माहित नाही. त्यामुळे यावेळी तयार झालेले ते मतदान कार्ड व राशनकार्ड यावरील जन्मतारखा आणि त्यानुसार वय अंदाजे टाकले असल्याने ते चुकीचे आहे.
८0 वर्षांच्या वृद्धांनासुद्धा या योजनेपासून वंचित ठेवणाचा प्रकार तालुका प्रशासनाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या वृद्ध निराधार लाभार्थ्यांचे अर्ज गावपातळीवर तलाठी कार्यालयातून भरला जातो. तलाठी कार्यालयातून अर्ज तालुकास्तरावर पाठविला जातो. तालुकास्तरावरुन पाठविला जातो. तालुकास्तरावरून त्रुट्या आल्या की, तलाठयांना परत लाभार्थ्यांना सांगून त्रुट्या पुर्ण करेपर्यंत बराच काळ लोटला. शासनानेसुद्धा लाभार्थी पात्रतेच्या अटी अत्यंत क्लिष्ट करून ठेवल्या आहेत. कागदपत्रे गोळा केली तर त्यामध्ये अनेक चुका दाखवून त्या लाभार्थ्यांना अधिकारी हाकलून लावतात, अशा तक्रारी आहेत. (नगर प्रतिनिधी)