लाभार्थी घरकुलापासून वंचित
By Admin | Published: September 7, 2015 12:48 AM2015-09-07T00:48:02+5:302015-09-07T00:48:02+5:30
केंद्र आणि राज्य शासन जाती निहाय घरकूल वाटपाचा कोटा पूर्ण करीत असताना गोवारी समाज बांधवावर अन्याय होत आहे.
व्यथा : गोवारी समाजावर अन्याय
चुल्हाड (सिहोरा) : केंद्र आणि राज्य शासन जाती निहाय घरकूल वाटपाचा कोटा पूर्ण करीत असताना गोवारी समाज बांधवावर अन्याय होत आहे. गोंडीटोला येथील सदाशिव राऊत या गरीब लाभार्थ्यांला अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याने उपेक्षित जीवन जगत आहे.
दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात गोवारी समाज बांधवांची मोठी संख्या आहे. आरक्षणाच्या यादीत एस.बी.सी. प्रवर्गात या समाजाची नोंद झाली आहे.
यामुळे या समाज बांधवांचा घरकुल वाटपाचा कोटा कधी पूर्ण होईल हे सांगणे कठीणच आहे. या गावात सदाशिव राऊत या गरीब लाभार्थ्याने आयुष्याची सत्तरी ओलांडली आहे. घरकुल योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी ग्रामसभा पिंजून काढली आहे. नावाची नोंद मात्र सदैव करण्यात येत असताना घरकूल प्राप्त झाल्याची आशावादी किरण राऊत यांचे दारात अद्याप पोहचली नाही.
जीर्ण आणि मोडकळीस घरात त्यांचे भीत भीत वास्तव्य सुरु आहे. दरवर्षी पावसाळ्यात घरांचा एक एक भाग कोसळत आहे. या घराला लाकडांची ओंडके आधार देत आहे. जीर्ण घर कधी कोसळेल याचा नेम नसताना गरीब या घरात वास्तव्य करण्यास भाग पाडत आहे. घरांचे सर्वेक्षण करणारी यंत्रणा नाही. घरकुल मंजुरी नंतर ही यंत्रणा गावात धावत सुटतो आहे.
परंतु ज्यांची घरे जीर्ण झाली आहेत अशा गरीब लाभार्थ्यांना न्याय देणारी यंत्रणा नाही.
अंत्योदय, दारिद्र्य रेषेखालील यादीत नावाची अट मायबाप शासनाने लावून मोकळे झाले आहे. परंतु या यादीत घोळाचा फटका गरीबांना बसतो. त्याचे काय? सदाशिव राऊत या गरिबांसारखे बीपीएल क्रमांक अतानाही अनेक लाभार्थी वंचित आहेत.
जीवनाच्या अखेरच्या क्षणी डोळ्यात अश्रू आणि घरकुलांची अपेक्षा घेवून सदाशिव राऊत यांचे कुटुंब शासनाच्या आधाराची वाटप पाहत आहेत. गरीब हा अभिशाप पुसून काढण्यासाठी आधार देण्याची गरज आहे. (वार्ताहर)