४५ कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ
By admin | Published: November 9, 2016 12:45 AM2016-11-09T00:45:43+5:302016-11-09T00:45:43+5:30
शासकीय सेवेत असताना १२ वर्षे किंवा २४ वर्षे सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला जातो.
अर्ज न करताही मिळाला लाभ : प्रथमच सेवा ज्येष्ठता निकष लागू
भंडारा : शासकीय सेवेत असताना १२ वर्षे किंवा २४ वर्षे सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी १२ वर्षे किंवा २४ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना अर्ज करावा लागतो. मात्र जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अर्ज न घेता सेवा ज्येष्ठता यादी ज्येष्ठता व पात्रतेच्या निकषावर कार्यालयातील ४५ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला.
दप्तर दिरंगाईमुळे आर्थिक लाभापासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आस्थापनेवरील तलाठी, मंडळ अधिकारी व शिपाई हे सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या प्रतिक्षेत होते. २०१४ ते आॅगष्ट २०१६ पर्यंत ज्यांची सेवा १२ वर्षे किंवा २४ वर्षे झाली असे कर्मचारी या योजनेसाठी पात्र होते. मात्र आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी अर्ज केलेले नव्हते. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी कुणाच्याही अर्जाची मागणी न करता सेवा ज्येष्ठता यादी व पात्रतेच्या आधारे लाभ देण्याचा निर्णय घेतला. पात्र कर्मचारी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली.
सन २०१४ ते आॅगष्ट २०१६ पर्यंत प्रलंबित १९ तलाठी संवर्गातील कर्मचारी व ४ शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना १२ वर्षांनंतर प्रथम आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. ११ मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचारी व ११ शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना २४ वर्षानंतर द्वितीय आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. सन २००२, २००८, २०१२ व २०१३ पासून या योजनेपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या योजनेचा ज्यांना लाभ मिळाला त्यात १५ शिपाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासनात हा संवर्ग दुर्लक्षिला जातो. मात्र जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढाकार घेऊन दिवाळीच्या दिवसात शिपाई या संवर्गाला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देऊन दिवाळी भेट दिली. यामुळे प्रशासकीय कामकाजात गतिमानता येऊन त्यांच्या कार्यक्षतेत व कार्यतत्परतेत वाढ होण्यासाठी मदत होईल. (जिल्हा प्रतिनिधी)