नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 12:31 AM2016-08-21T00:31:09+5:302016-08-21T00:31:09+5:30
यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.
नाना पटोले यांची माहिती : खासदार, आमदारांनी केली पाहणी, शेतकऱ्यांना दिला दिलासा
साकोली : यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. किन्ही मोखे येथे लष्करी अळीच्या प्रकोपाने नुकसान झालेल्या पिकांची पाणी करताना खासदार नाना पटोले यांनी ही माहिती यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिली.
लष्करी अळी, गादमाशी रोगापासून पिकांना नुकसान झाले असेल त्यांना पूर्णपणे नुकसान भरपाई मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहायक यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या नावे साधा अर्ज करून त्यात पिकविम्याचे नंबर टाकायचे आहे. अर्ज प्राप्त होताच कृषी सहायक त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे व त्या आधारावर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार आहे. किन्ही येथील शेतकऱ्यांच्या पिकांना अडींचा प्रादुर्भाव दिसून आला. खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशीवार यांनी शेतबांधावर भेट दिली. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. नलिनी भोयर, उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. सांगळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी किरवे, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, कृषी पर्यवेक्षक चंदन मेश्राम, कृषी पर्यवेक्षक राधेश्याम खोब्रागडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी खासदार पटोले यांनी परिसरातील शेतीची पाहणी केली व त्यावर कृषी विभागाने तात्काळ उपाय करण्याच्या सुचना दिल्या. तालुक्यात लष्करी अळीचा प्रादूर्भाव असून शेत पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पुन्हा नव्या संकटामुळे अडचणीत आणले आहे. (तालुका प्रतिनिधी)
यावेळी शेतकऱ्यांची समस्या गंभीर आहे. आधीच निसर्ग कोपला व रोगाने कहर माजविला. त्यामुळे या लष्करी अळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनातर्फे लवकरच अनुदानावर किटकनाशक औषधी तात्काळ पुरवू. तसेच भारनियमनावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना कृषीपंपाचे कनेक्शन मिळाले नाही, त्यांना लवकरच देऊ.
- बाळा काशीवार
आमदार, साकोली