दुष्काळग्रस्त गावांना मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:07 PM2017-09-20T23:07:22+5:302017-09-20T23:07:42+5:30
ज्या तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमान ३० सप्टेंबरपर्यंत ५० टक्यांपेक्षा कमी असेल, अशा गावांना दुष्काळग्रस्त योजनांचा लाभ मिळणार आहे,....
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :ज्या तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमान ३० सप्टेंबरपर्यंत ५० टक्यांपेक्षा कमी असेल, अशा गावांना दुष्काळग्रस्त योजनांचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली. या आशयाचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या चर्चेत दिल्याचेही पटोले यांनी सांंिगतले.
बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक नितीन धकाते, विकास मदनकर आदी उपस्थित होते. खा. पटोले म्हणाले, जिल्ह्यातील शेतकºयांची अवस्था फार वाईट आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ओरीसा राज्याप्रमाणेच धानाला २,९९० रूपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली आहे.
मे महिन्यात पाण्याची पातळी जेवढी खाली गेली नाही तेवढी सप्टेंबर महिन्यात खालावली आहे. दुष्काळसदृष्य परिस्थीतीत धान्यासह बियाणांचाही पुरवठा केला जातो. मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे.
पावसाचा फक्त एक नक्षत्र उर्वरित असून या कालावधीत हव्या त्या मार्गाने वाहणारे पाणी अडविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जेणकरुन भविष्यकालीन स्थिती हाताळता येईल.
दिवाळीच्या तोंडावर स्वस्त धान्य दुकानातून साखरेचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी रेटून धरली. महिन्याभराच्या काळात ग्रामपंचायतच्या निवडणूका असल्याने त्यात आपण कुठेही मध्यस्थी करणार नसून ग्रामस्थांनी या निवडणूका शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
मी फक्त जनतेचाच सेवक
मागील महिन्याभरापासून प्रधामंत्री व मुख्यमंत्री यांच्या धोरणाविरुध्द सुर उमटविणा-या खा. नाना पटोले यांना या बाबत छेडले असता ते म्हणाले, मी फक्त जनतेचा सेवक आहे. जिथे कुठे गरीब व माझा बळीराजाला कुणी संकटात आणू पाहत असेल तर मी आपल्या पदाचीही पर्वा करणार नाही. कुठे चुकत असेल तर ते ठामपणे सांगणे हा माझा संवैधानिक अधिकार आहे. मी कुठल्याही परिस्थीतीत शेतकºयांची साथ सोडणार नाही.