१०.०५ लाख लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:39 PM2018-06-19T22:39:59+5:302018-06-19T22:40:15+5:30
केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळत आहे.
सदर योजनेंतर्गत तिहेरी शिधापत्रिका पध्दती संपुष्टात येऊन प्राधान्य कुटूंब योजना लागू केली आहे. यामध्ये बीपीएलचे १०० टक्के लाभार्थी तसेच केशरी शिधापत्रिका मधून ग्रामीण क्षेत्राकरीता ४४ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या व शहरी क्षेत्राकरीता ५९ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये जिल्हयातून एकूण ७ लाख ११ हजार ६५ पात्र लाभार्थ्यांची निवड करुन प्रती व्यक्ती ५ किलो अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. अंत्योदय योजनाचे ६४ हजार ५८५ शिधापत्रिका मधील २ लाख ९४ हजार २८३ लाभार्थ्यांना प्रती कार्ड ३५ किलो अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे.
दोन्ही योजनेत जिल्हयातील एकूण २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिका वरील लोकसंख्या १० लाख ५ हजार ३४८ एवढया लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न्न सुरक्षा योजनांतर्गत अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. सदर लाभार्थ्यांना २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदुळ या प्रमाणे धान्य वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अजूनही ४१ हजार ७४१ केशरी शिधापत्रिका अन्न सुरक्षा योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत शासनास अवगत करण्यात आले असून वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आलेली आहे. सदर वाढीव इष्टांक प्राप्त होताच प्रतिक्षेत असलेल्या पात्र केशरी शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ देण्यात येईल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत प्रतिक्षेत असलेल्या ४१ हजार ७४१ शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागातर्फे शासनास वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात कुठलाही पात्र लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे.