३३ हजार लाभार्थ्यांना मिळणार अन्न सुरक्षा योजनेचा लाभ
By admin | Published: October 23, 2016 01:05 AM2016-10-23T01:05:56+5:302016-10-23T01:05:56+5:30
सार्वजनिक वितरण प्रणालीच्या नवीन संगणकीकृत यादीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा तुमसर विधानसभा...
लाभार्थ्यांना दिलासा : तहसीलदारांना मिळाल्या सूचना
भंडारा : सार्वजनिक वितरण प्रणालीच्या नवीन संगणकीकृत यादीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा तुमसर विधानसभा क्षेत्रातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील अनुक्रमे १८ हजार व १५ असे ३३ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी पाठपुरावा केला होता.
१ फेब्रुवारी २०१४ पूर्वीच्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत होता. परंतु, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत उपरोक्त इष्टांकाच्या मर्यादेमुळे जे लाभार्थी सवलतीच्या दराने अन्नधान्याच्या लाभ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. अशा राज्यातील उर्वरित १७७.१९ लाख लाभार्थ्यांना सार्वजनिक व्यवस्थेच्या प्रणालीत संगणकीकृत करण्यात आले आहे.
डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयान्वये विहीत वार्षिक उत्त्पन्नाच्या मर्यादेनुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ देता आला नाही. परंतु राज्यातील शिधापत्रिकांच्या व त्यावरील सदस्यांचा डिजीटलायझेशनच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता भंडारा जिल्ह्यातील इष्टांक शिल्लक असल्याचे आ.वाघमारे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी ही बाब समजावून सांगितली. त्यानंतर शासनाने जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्याबाबतच्या कार्यवाहीचे संबंधित विभागाला निर्देश दिले. आता या योजनेत तुमसर तालुक्यात १८ हजार तर मोहाडी तालुक्यात १५ हजार इष्टांक वाढवून देण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. पात्र असलेल्या परंतु अन्न सुरक्षा योजनेतून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दखल घेण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी तुमसर व मोहाडी तहसीलदारांना दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)