योजनेचा गरिबांना लाभ हीच खरी समाजसेवा
By admin | Published: March 6, 2017 12:15 AM2017-03-06T00:15:58+5:302017-03-06T00:15:58+5:30
अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नाकडे कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपण जनतेचे सेवक आहोत.
नाना पटोले : साकोलीत जनता दरबार, पाणी, रुग्णालय, बीपीएलचा प्रश्न गाजला
साकोली : अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नाकडे कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपण जनतेचे सेवक आहोत. सामाजिक भान ठेवून सामाजिक दृष्टीकोण ठेऊन मनाची मानसिकता बदलवून समाजाला आपले काही देणे आहे हे समजले पाहिजे. अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ गरीबांना दयावा हीच खरी समाजसेवा आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांनी गरीब जनतेला त्रास देवू नये, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
येथील मंगलमुर्ती सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनिंयत्रण अंतर्गत खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, जि.प. सदस्य होमराज कापगते, जि.प. सदस्य डॉ. नेपाल रंगारी, रेखा वासनिक, दिपक मेंढे, सभापती धनपाल उंदिरवाडे, अशोक कापगते, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसिलदार खडतकर, पोलिस निरिक्षक जगदिश गायकवाड, आदी उपस्थित होते.
जनता दरबारात मुंडीपार येथील वैशाली विजय पटले यांनी भेल प्रकल्प केव्हा सुरू होणार व बेरोजगारी कधी दुर होणार याविषयी प्रश्न विचारला. डॉ. नरेश राऊत यांनी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालय आॅक्सीजनवर असुन विद्युत, पाणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा आदी व्यवस्था करण्यात यावी हा मुद्दा उचलला.
साकोली नगरपरिषदेचे नगरसेवक रोहिणी मुंगूलमारे यांनी खूप लोक गरीब आहेत, परंतु त्यांचे दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नाही. त्यामुळे त्यांना योजनेपासुन वंचित राहावे लागत आहे, हा मुद्दा उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.
गोंडउमरी येथील पौर्णिमा चांदेवार यांनी गोंडउमरीत दारुबंदी असुन सुध्दा दारु सुरु राहते, हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयाची नोंद घेतली.
असे अनेकांनी विविध प्रश्न विचारले त्यावर अनेक अधिकाऱ्यांनी उत्तर दिले पंरतु प्रत्यक्ष त्यांच्या अर्जाचा विचार करुन प्रश्न निकालात काढावे नाहीतर जनता दरबार संपला आपल्याला काम करायचे आहे. असे वेळकाढु धोरण बरोबर नहाी. एकुण प्रशासनाकडे २०० अर्ज प्राप्त झाले व वेळेवर वेगळे प्रश्न उपस्थित झाले.
नाना पटोले यांनी एका अधिकाऱ्याला विचारले साकोली तालुक्यात पाणी टंचाई आहे काय? त्या अधिकाऱ्याने आकडेवारीवरुन कोणत्याच गावात पाणी टंचाई असे सांगितले पंरतु जनता दरबारातील खुप लोक उठून आमच्या गावात पाणी टंचाई प्रत्यक्ष या आम्ही सांगतो. त्यावेळेस अधिकाऱ्यांची खासदारासमोर धांदल झाली. कित्येक गावात पाणी टंचाई आहे हे जरा लक्षात घ्या तसे सर्वेक्षण करा, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य बीपीएल अंतर्गत कुटूंबातील प्रमुख व्यक्ती मृत पावले, तर त्या योजनेअंतर्गत २० हजार रुपये दिले जाते. अशा ३३ लाभार्थ्यांना खा. पटोले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. एकंदरीतच अनेक समस्या या जनता दरबारातून लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या. या समस्या सोडविण्यासाठी शासन - प्रशासन पुढाकार घेण्याची खरी गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)