उद्दिष्टपूर्तीसाठी शौचालय असलेल्यांनाही लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2017 12:22 AM2017-02-07T00:22:40+5:302017-02-07T00:22:40+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोहाडी तालुक्याला १०,६८४ शौचालयाचे उद्दिष्ट देण्यात आले असून ...

Benefits to those who have toilets for the purpose | उद्दिष्टपूर्तीसाठी शौचालय असलेल्यांनाही लाभ

उद्दिष्टपूर्तीसाठी शौचालय असलेल्यांनाही लाभ

Next

लाभार्थी निवडीत गैरव्यवहार : मोहाडी तालुक्यात १०,६९४ शौचालयांचे उद्दिष्ट
सिराज शेख मोहाडी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोहाडी तालुक्याला १०,६८४ शौचालयाचे उद्दिष्ट देण्यात आले असून याद्वारे संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प मोहाडी पंचायत समितीने केला आहे. मात्र यात खऱ्या लाभार्थ्यांना डावलून ज्यांच्याकडे पुर्वीचेच शौचालय आहे अशांची नावे शौचालय लाभार्थीच्या यादीत असून जुन्याच शौचालयाला रंगरंगोटी करून नवीन दाखविण्यात आले आहे तर ज्यांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे त्यांना सुद्धा शौचालयाचा लाभ देण्यात आला आहे.
घरकुल लाभार्थ्याला शौचालय बांधल्याशिवाय शेवटचा धनादेश देण्यात येत नाही हे विशेष. दोन अशासकीय कर्मचारी शौचालय लाभार्थ्याकडून २०० ते ३०० रूपये घेवून शौचालयाची फोटो काढून देतात तसेच अनुदानाची रक्कम सुद्धा मिळवून देतात ७ हजार शौचालयाचे काम पूर्ण झाले असल्याने ही रक्कम लाखोच्या घरात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
निर्मलग्राम योजनेत अनेक गावे निर्मलग्राम झाली व त्या गावांना हागणदारीमुक्तीचा पुरस्कार सुद्धा मिळाला. याचाच अर्थ त्या गावातील सर्व घरात शौचालय तयार झाले असावे मग त्या गावात पुन्हा शेकडो शौचालय लाभार्थ्यांची यादी तयार कशी झाली हे एक कोडेच आहे.
करडी ग्रामपंचायतला सन २००८ साली निर्मलग्राम हागणदारीमुक्तीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. तरी या गावातील ग्रामपंचायतीने ५०५ शौचालय लाभार्थीची जम्बो यादी तयार केली अून लाभ देण्यात येत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी मताच्या राजकारणातून आपले मत पक्के करण्यासाठी वाट्टेल त्याला शौचालयाचा लाभ देत आहेत. मात्र मोहाडी पंचायत समितीतर्फे शौचालयाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी विस्तार अधिकारी यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासोबत समन्वयक सुद्धा देण्यात आले आहे व एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीने लाभार्थ्याची चौकशी करणे गरजेचे आहे की त्यांच्याकडे खरोखरच शौचालय आहे किंवा नाही मात्र उद्दीष्ट पुर्तीसाठी सर्व गोरख धंदा सुरू असून शासनाचा निधी बोगस लाभार्थ्यांना प्राप्त होत आहे. याकडे कुणाचेच लक्ष नाही.
करडी येथील एक लाभार्थी राजेंद्र तुमसरे यांनी सरपंच करडी यांना अर्ज करून शौचालय लाभार्थी यादीतून नाव वगळण्यासाठी विनंती केली आहे. कारण त्यांच्याकडे पुर्वीचेच पक्के शौचालय आहे. याच प्रकारे करडी गावात काही धनदांडगे, शासकीय नौकर, पेन्शनर व पुर्वीचेच शौचालय असणाऱ्यांना सुद्धा शौचालयाचा लाभ देण्यात आलेला आहे. याकडे सुद्धा राजेंद्र तुमसरे यांनी अर्जातून लक्ष वेधले आहे. १०,६९४ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट मार्चअखेर पर्यंत पुर्ण करायचे असल्याने शौचालय बांधकाम धडाक्यात सुरू आहेत. मात्र या प्रकारामुळे शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून वाहवाही लुटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जाणवते.

मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: केला सर्वे
मोहाडी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी स्रेहा करपे यांनी स्वत: शहरात फिरून खऱ्या लाभार्थ्यांची चौकशी करूनच शौचालयाच्या यादीस मंजुरी दिली. त्यामुळे शौचालय लाभार्थीच्या यादीतून अनेकांची नावे वगळण्यात आली. लाभार्थ्यांच्या घरी शौचालय आहे किंवा नाही हे त्यांनी स्वत: पाहूनच लाभार्थी यादीला अंतिम रूप दिले. त्यामुळे येथे एकही बोगस व्यक्तीला लाभ मिळणार नाही हे निश्चित आहे. याउलट अनेक गावात याउलट परिस्थिती आहे. पुर्वीचेच शौचालय असणाऱ्या राजेंद्र तुमसरे यांना लाभ नको म्हणून विनंती करावी लागत आहे. याला काय म्हणावे शौचालय लाभार्थ्यांची निष्पक्ष चौकशी केल्यास गैरव्यवहार बाहेर येऊ शकतो, असे बोलले जात आहे.

सन २०११-१२ च्या सर्व्हेनुसार याद्या तयार झाल्या होत्या. त्या याद्या पुन्हा ग्रामपंचायतीला पाठवून घरकुल लाभार्थी, गाव सोडून गेलेले मृत्यू पावलेले आदींचे नाव वगळण्याच्या व खऱ्या लाभार्थ्याचे नाव समाविष्ट करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. अनावश्यक व्यक्तीला लाभ देण्यात आला असेल तर सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई होऊ शकते. दोन व्यक्ती पैसे घेतात याबाबत माहिती नाही.
- गजानन लांजेवार, प्र.गटविकास अधिकारी मोहाडी.

Web Title: Benefits to those who have toilets for the purpose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.