खबरदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:57+5:302021-04-19T04:32:57+5:30
भंडारा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असून याचा ताण आराेग्य यंत्रणेवर येत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांचे काही नातेवाईक ...
भंडारा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असून याचा ताण आराेग्य यंत्रणेवर येत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांचे काही नातेवाईक आणि डाॅक्टर व नर्स यांच्यासाेबत वाद घालतात. प्रसंगी मारहाणीचे प्रसंग घडतात. मात्र या पुढे डाॅक्टर नर्ससाेबत वाद करणे चांगलेच महागात पडणार आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अशा प्रकरणात कठाेर कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहे. भंडारा जिल्ह्यात दरराेज हजार ते बाराशे रुग्ण पाॅझिटिव्ह आढळत आहेत. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध नाही. संपूर्ण आराेग्य यंत्रणेवर माेठा ताण वाढत आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रशासन आणि आराेग्य यंत्रणा रुग्णांना सेवा देण्यासाठी अहाेरात्र प्रयत्न करीत आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून डाॅक्टरांसाठी प्रत्येक रुग्ण हा महत्त्वाचा असताे. प्रत्येकाला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी प्रशासन कटीबद्धदेखील आहे. परंतु अचानक रुग्णसंख्या वाढल्याने वेळेवर उपचार मिळण्यास विलंब हाेताे. अशा परिस्थितीत रुग्णांचे काही नातेवाईक डाॅक्टरांसाेबत वाद घालतात. प्रसंगी मारहाणही करतात. यामुळे डाॅक्टरांचे मनाेधैर्य खचत आहे. आधीच आपला जीव धाेक्यात घालून ही मंडळी अहाेरात्र परिश्रम करीत आहे. या वादाच्या प्रकाराची जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. डाॅक्टर नर्ससाेबत वाद घालणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हा नाेंदविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
बाॅक्स
नातेवाइकांनी संयम बाळगावा
काेराेना संसर्गाच्या काळात अनेक डाॅक्टर, नर्स यांना काेराेनाची बाधा झाली. त्यातून दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाली. अनेक डाॅक्टर आपला जीव धाेक्यात घालून उपचार करीत आहे. परंतु काही रुग्णांचे नातेवाईक वाद घालतात अशा नातेवाइकांनी संयम बाळगून आराेग्य यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे. रुग्णांच्या नातेवाइकांची अगतिकता प्रशासन समजू शकते. मात्र उपलब्ध साधन सामग्री उत्तम व तत्पर सेवा देण्याला प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकारी कदम यांनी सांगितले.