खबरदार! रेल्वे रूळ ओलांडणे पडेल महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:31 AM2021-03-15T04:31:23+5:302021-03-15T04:31:23+5:30
धडक कारवाई मोहीम यासह जनजागृती अभियान वरठी : रेल्वे प्रवासी व लगतच्या वस्तीतील नागरिकांना रेल्वेच्या सक्तीच्या नियमाचा फटका बसणार ...
धडक कारवाई मोहीम यासह जनजागृती अभियान
वरठी : रेल्वे प्रवासी व लगतच्या वस्तीतील नागरिकांना रेल्वेच्या सक्तीच्या नियमाचा फटका बसणार आहे. रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वेस्थानक परिसरात अनधिकृत प्रवेश, विनापरवाना सामान विक्री, अकारण बसून गप्पा मारणे किंवा प्रवास करताना अकारण चेन ओढणाऱ्या प्रवाशांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यापुढे पकडले गेल्यास महागात पडणार असून, यासाठी दंड किंवा शिक्षा होणार आहे.
धावत्या रेल्वेगाड्यातून प्रवास सुखकारक व्हावा व रेल्वे रूळ व परिसरात होणाऱ्या अपघाताला आळा बसावा म्हणून रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. भंडारा रोड रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने रेल्वे प्रवासी, रेल्वे रुळालगत गावकऱ्यांना या अभियानांतर्गत माहिती देण्यात येत आहे. यासाठी रेल्वे स्टेशन व लगतच्या वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे.
भारतीय रेल्वेने कात टाकत प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे. भारतात रेल्वे प्रवास सर्वांत सुरक्षित मानला जातो.
धावत्या रेल्वेगाडीला अनावश्यक चेन ओढून थांबण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. यावर रेल्वे विभागाने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. अनावश्यक चेन ओढणे, धावत्या गाडीत दरवाज्याजवळ उभे राहणे यासह अनधिकृत सामान विकणाऱ्यांवर सरळ कारवाई करण्यात येत आहे.
सध्या रेल्वे प्रवासी गाड्या ताशी १३० कि.मी. वेगाने धावत आहेत. यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी तपासून नियोजन करण्यात आले आहे; पण रेल्वे रुळालगतच्या वस्त्यातील अनेक नागरिक बेमालूमपणे रेल्वे रुळावर ठाम मांडून बसलेले आढळतात. अनेक भागांत आजही बेदिक्कत रेल्वे रूळ ओलांडण्याची प्रथा सुरू आहे. यामुळे रेल्वे रुळावर होणाऱ्या अपघाताची संख्या वाढली आहे. ताशी १३० कि.मी. वेगाने धावणारी गाडी प्रयत्न करूनही थांबवता येत नसल्याने नागरिकांनी सतर्क राहून जीव व वित्तहानी टाळावी यासाठी सजग राहण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी केले आहे. यावेळी उपनिरीक्षक जय सिंग, ओमप्रकाश
टेंबुर्णे, वसंता भेंडारकर, जयंतीलाल, शोभा नांगर, भूपेश देशमुख, अरविंद टेंबुर्णीकर उपस्थित होते.