खबरदार, स्कार्फ बांधून दुचाकी चालवाल तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:24 PM2018-08-24T21:24:15+5:302018-08-24T21:25:25+5:30
शहरासह ग्रामीण भागातही शहरी भागातही दुचाकी चालविताना तोंडाला स्कार्फ बांधण्याची फॅशन आली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ बांधला जात असला तरी अलीकडे रात्रीसुद्धा स्कार्प बांधून भटकणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरासह ग्रामीण भागातही शहरी भागातही दुचाकी चालविताना तोंडाला स्कार्फ बांधण्याची फॅशन आली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ बांधला जात असला तरी अलीकडे रात्रीसुद्धा स्कार्प बांधून भटकणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली आहे. असे स्कार्फ बांधून फिरणारे वाहन चालक आता पोलिसांच्या निशाण्यावर असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पोलीस खात्याने घेतला आहे.
शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुचाकीची संख्या वाढली आहे. प्रत्येकजण घराबाहेर पडताना दुचाकी घेऊनच निघतो. हेल्मेट ऐवजी अनेकजण तोंडाला स्कार्फ बांधतात. वेगवेगळ्या रंगाचे दुपट्टे तोंडाला बांधल्या जात असल्याने दुचाकी चालक नेमका कोण आहे याचा थांगपत्ता लागत नाही.
उन्हापासून बचाव आणि त्वचेच्या रक्षणासाठी स्कार्फ बांधला जात असल्याचे दुचाकी चालक सांगतात. परंतु सर्रास दुचाकी चालक रात्रीसुद्धा तोंडाला स्कार्प बांधून भटकंती करतात. मुलींमध्ये तर स्कार्फ बांधण्याची जणून फॅशनच आली आहे. दुचाकीवरून जाणारी मुलगी आपल्या वडिलांनाही ओळखू येणार नाही, अशा पद्धतीने स्कार्फ बांधतात. या सर्व प्रकाराने आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र, नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचे प्रकार शहरात घडत आहे. काही ठिकाणी एटीएम फोडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या घटना घडल्या तेव्हा आरोपी दुचाकीवरून आलेले आणि तोंडाला स्कार्फ बांधून असलेलेच होते. त्यामुळे या आरोपींची ओळख पटविणे कठीण जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ही मंडळी सापडत नाही. त्यामुळे पोलिसांना आरोपी शोधने मोठे कठीण जाते.
आता शहरात स्कार्फ बांधून फिरणारे दुचाकीस्वार पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. तोंडाला स्कार्फ बांधून फिरणाऱ्या वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्याचा निर्णय स्थानिक गुन्हे शाखेने घेतला आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आर.ए. मानकर यांनी केले आहे. तसेच पालकांनीसुद्धा आपल्या मुला-मुलींना स्कार्प बांधून दुचाकी चालवू नये असी समज देण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.
अल्पवयीन दुचाकी चालकावर कारवाई
विनापरवाना वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. त्यातच अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना शहरात दिसतात. शाळकरी मुलांचाही यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. परवाना नसताना पालक आपल्या मुलांच्या हाती दुचाकी देतात. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात नजर टाकली तरी अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना दिसून येतात. अशा दुचाकी चालकांवरही पोलीस आता कारवाई करणार आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना परवाना काढून द्यावा. परवाना नसेल तर त्यांना दुचाकी देवू नये, असे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालकांनी तोंडाला स्कार्प बांधू नये. स्कार्फ बांधल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. तसेच अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यासाठी पालकांनी देवू नये. अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळल्यास मुलांसोबत पालकांवरही मोटरवाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.
-विनिता शाहू, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा.