Bhandara: आरटीई मोफत प्रवेशाकडे ५० पालकांची पाठ, चार फेऱ्यांनंतर आता प्रवेशाची आशा धूसर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 03:21 PM2023-08-27T15:21:24+5:302023-08-27T15:22:18+5:30
RTE Free Admission: शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटत असले तरी, शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत प्रवेशाच्या फेऱ्यांचे गुऱ्हाळ सुरूच आहे. चौथी फेरी होऊनही ५० जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.
- देवानंद नंदेश्वर
भंडारा - शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटत असले तरी, शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत प्रवेशाच्या फेऱ्यांचे गुऱ्हाळ सुरूच आहे. चौथी फेरी होऊनही ५० जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत. लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे पालकांनी इतरत्र प्रवेश घेतले आहेत. परिणामी, आरटीईच्या मोफत प्रवेशाकडे ५० पालकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडत (लॉटरी) काढण्यात आली होती. जिल्ह्यातील ८९ शाळांमध्ये ७६३ जागा आरटीईअंतर्गत आरक्षित असून, त्यासाठी ५ एप्रिलला काढण्यात आलेल्या सोडतीत ७६३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक १, २, ३,४ मधील सर्व बालकांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चौथ्या फेरीपर्यंत ७१३ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चिती झाला असून, त्याची टक्केवारी ९३.४५ आहे. आता मोफत प्रवेशाची आशा धूसर झाली आहे.
लाखनी तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद
आरटीईअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून कित्येकदा मुदत वाढवून देण्यात आली. यात लाखांदूर तालुक्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे दिसत आहे. तेथे सर्वच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, तालुका प्रथम क्रमांकावर आहे. लाखनी तालुक्यात प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, ७६ पैकी फक्त ६० प्रवेश निश्चित झाले. त्याची ७८.९५ एवढी टक्केवारी असून, लाखनी तालुका जिल्ह्यात माघारलेला आहे.
तालुकानिहाय शाळा व प्रवेश
तालुका शाळा जागा प्रवेश
भंडारा २५ २२० २०३
लाखांदूर ४ २० २०
लाखनी ८ ७६ ६०
मोहाडी १६ १२२ ११८
पवनी १२ ७७ ७६
साकोली ९ ७९ ७५
तुमसर १५ १६९ १६१
एकूण ८९ ७६३ ७१३