भंडारा व गोंदिया जिल्हा ‘चाटू’ पक्ष्यांचे माहेरघरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 09:34 PM2018-11-28T21:34:47+5:302018-11-28T21:35:06+5:30
भंडारा व गोंदिया जिल्हा भात व तलावाचे जिल्हे म्हणून प्रसिध्द आहेत. त्याचप्रमाणे चाटू पक्ष्यांचे माहेरघर म्हणूनही नावलौकीक आहे. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागझीरा व्याघ्र प्रकल्पात या चाटू पक्ष्यांची संख्या सर्वाधिक पाहायला मिळते हे विशेष.
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : भंडारा व गोंदिया जिल्हा भात व तलावाचे जिल्हे म्हणून प्रसिध्द आहेत. त्याचप्रमाणे चाटू पक्ष्यांचे माहेरघर म्हणूनही नावलौकीक आहे. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागझीरा व्याघ्र प्रकल्पात या चाटू पक्ष्यांची संख्या सर्वाधिक पाहायला मिळते हे विशेष. जिल्ह्यात तलावाची संख्या अधिक असल्यामुळे अनादीकाळापासून विदेशी पक्षाचे या जिल्ह्यात आगमन आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.
संस्कृत भाषेत दर्वितुंड नावाने ओळख असलेल्या या लांब चोचीच्या पक्ष्याला भंडारा जिल्ह्यात चाटू या नावाने ओळखले जाते. या पक्ष्याचे पाय लांब काळे असून त्याची लांबी ६० सेंमी असते. तर याची मान लांब असून चोचीवर नक्षीकामासारखे कोरलेली असते. भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीकांत, म्यानमार आदी देशात या पक्षांची ये-जा चालू असते. म्हणूनच या पक्ष्याला निवासी आणि भटके पक्षी म्हणून ओळखले जाते.
सारसासारख्या सरोपराशी नाते असलेला हा पक्षी पांढराशुभ्र असुन सकाळी आणि सायंकाळी चोचीच्या सहाय्याने चिखलातील कीटक, बेडूक यासारख्या पाण्यातील वनस्पती व किटक खातो. दिवसेंदिवस या पक्ष्याची संख्या रोडावत आली आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे विशेष म्हणजे तलावात पाणी असणे गरजेचे ठरले आहे. मात्र दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलावात पाणी राहत नाही. त्यामुळे विदेशी पाहुण्यांना अन्न व जलतरण करण्यास सोईचे होत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे.
मागील आठ दहा वर्षापासून या पक्ष्यांची संख्या रोडावतांना दिसते आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. तलावात पाणी साचत नाही. त्यामुळे पक्षी तलावात येत नाही. तलावांची दुरुस्ती करुन तलावात अधिकाधिक पाणी साठवून राहावे व नैसर्गिक समतोल राहावा. विदेशी पाहुणे या जिल्ह्याची शान आहे व ती अशीच अबाधित राहावी, एवढीच इच्छा आहे.
-विनोद भोवते, पक्षी निरीक्षक