भंडारा-बालाघाट रस्त्याचे होणार चौपदरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:40 AM2021-08-12T04:40:29+5:302021-08-12T04:40:29+5:30
चुल्हाड (सिहोरा) : भंडारा-बपेरा-बालाघाट या १०६ किमी अंतराच्या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यावसायिकांत चौपदरीकरण ...
चुल्हाड (सिहोरा) : भंडारा-बपेरा-बालाघाट या १०६ किमी अंतराच्या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यावसायिकांत चौपदरीकरण रस्ता बांधकामावरून चिंता वाढली आहे. यात अनेक दुकान आणि घरांवर बुलडोझर चालणार असल्याने अनेकांची झोपच उडाली आहे. सिहोरा परिसरात अनेक नवीन घरांचे बांधकाम थांबविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. किती मीटर रुंदीकरण असणार अशी चौकशी नागरिक करत आहेत. रस्ता चौपदरीकरणाची मागणी जुनीच आहे.
भंडारा-बपेरा-बालाघाट हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली असता श्रेय घेण्यासाठी आता चढाओढ सुरू झाली आहे. सत्तापक्ष व विरोधी पक्षातील नेत्यांनी श्रेयासाठी प्रयत्न सुरू केला आहे. चौपदरीकरण रस्ता बांधमाला सुरुवात झाल्यास अनेक दुकाने, घरे, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज व अन्य इमारतींवर बुलडोझर चालणार आहे. चौपदरीकरण महामार्गाचे रुंदीवरून अनेक कयास लावले जात आहेत.
बपेरा सीमा आंतरराज्यीय असल्याने चेक पोस्ट लागणार की नाही, अशा चर्चा रंगल्या आहेत. रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याने मार्गाच्या कडेची कामे व्यावसायिकांनी थांबविली आहेत. अनेकांची घरे व दुकाने तोडण्यात येणार असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. अनेक व्यावसायिकांनी नव्या जागेचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी नवीन घरांचे बांधकाम थांबविले आहे. चौपदरीकरण रस्ता बांधकामामुळे सर्वाधिक फटका ग्रामपंचायतच्या गाळे बांधकामाला बसणार आहे. रस्ता बांधकाम मंजुरीने नागरिक, व्यावसायिकांत कही खुशी, कही गम असे चित्र आहे.
बाक्स
तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे वाढणार
सिहोरा परिसरातून जाणाऱ्या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्यानंतर चौपदरीकरण होणार आहे. बावणथडी नदीवरील पुलाचे बांधकाम पुन्हा नव्याने होणार असले तरी या परिसरात रोजगाराच्या संधी नाहीत. राष्ट्रीय महामार्ग या संधी उपलब्ध करणार आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ, जागृत हनुमान देवस्थान तीर्थक्षेत्र भक्त भाविक, पर्यटकांनी फुलणार आहे. याच मार्गावर कान्हा किसली व्याघ्र प्रकल्प असल्याने पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन विकासाकरिता राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. पर्यटनस्थळ राज्य शासनाच्या अखत्यारित येत असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरण करण्यात आल्याने विकासकार्याची अपेक्षा आहे. मार्गावरील ग्रीन व्हॅली चांदपूर, तीर्थक्षेत्र विकासकामासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी युवानेते किशोर राहगडाले, ग्रामपंचायत सदस्य शीतल चिंचखेडे, सरपंच ऊर्मिला लांजे, सरपंच ममता राऊत यांनी केली आहे.