भंडारा बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:51+5:302021-01-13T05:32:51+5:30
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाविरोधात भाजपने सोमवारी बंदची हाक दिली होती. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. खासदार ...
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाविरोधात भाजपने सोमवारी बंदची हाक दिली होती. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात शहरातील विविध मार्गाने फिरून व्यापारी व नागरिकांना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्निकांडात दहा निरागस चिमुकल्यांचा बळी गेला. मात्र त्यानंतरही शासनाच्या वतीने केवळ चौकशी समितीची घोषणा करण्यात आली. अद्यापपर्यंत कुणावरही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. तात्काळ गुन्हा नोंदविण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बंदची हाक देण्यात आली होती.
सकाळी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. भाजपचे पदाधिकारी गटागटाने फिरून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करीत होते. शहरातील गांधी चौक, बडा बाजार, बसस्थानक परिसर, राजीव गांधी चौक, खात रोड, त्रिमूर्ती चौक परिसर आदी ठिकाणी बंदचा प्रभाव दिसत होता. दुपारनंतर मात्र व्यापारी प्रतिष्ठाने हळूहळू उघडण्यात आली. या बंद दरम्यान शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.
तोपर्यंत भाजप शांत बसणार नाही -सुनील मेंढे
न्यायालयीन चौकशी आणि दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत भाजप शांत बसणार नाही, असे खासदार सुनील मेंढे यांनी येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले. शासन एवढ्या मोठ्या घटनेला सहजपणे घेत आहे. सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. दोन दिवसात दोषींना निलंबित करून न्यायालयीन चौकशीची घोषणा न केल्यास भाजप स्वत: या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करेल असे सांगितले. यावेळी जिल्हा प्रभारी संजय भेंडे, डाॅ. उल्हास फडके, महामंत्री मुकेश थानथराटे, शहर अध्यक्ष संजय कुंभलकर उपस्थित होते.