भंडारा बाजार समिती निवडणूक! छत्री व कपबशी चिन्ह्यात होणार काट्याची लढत
By युवराज गोमास | Published: April 21, 2023 06:26 PM2023-04-21T18:26:16+5:302023-04-21T18:26:28+5:30
भंडारा बाजार समितीची यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.
भंडारा: भंडारा बाजार समितीची यंदाची निवडणूक काट्याची होणार आहे. शुक्रवारी दुपारी चिन्हांचे वाटप उपनिबंधक कार्यालयात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गटाच्या शेतकरी एकता पॅनेलने छत्री, तर काँग्रेस समर्थीत पॅनेलने कपबशी चिन्हाला पसंती दर्शविली आहे. तीन अपक्ष गॅस सिलिंडर व टेबल चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गटाचे समर्थक एकमेकांविरुद्ध दंड थोपटून आहेत. २० एप्रिल रोजी २९ उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्यानंतर ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार आहेत. एकूण १८ संचालकपदांसाठी ही निवडणूक होत असून ३६ उमेदवार मैदानात असल्याने दोन गटांत युद्ध लढले जाणार आहे. काँग्रेस समर्थीत गट या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडत भाजप, शिंदे गटाशी घरोबा केला आहे. चिन्हवाटपाच्या दिवशी काँग्रेस समर्थीत शेतकरी सहकार पॅोलने कपबशी चिन्हाची मागणी केली. राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गट समर्थीत शेतकरी एकता पॅनेलने छत्री चिन्हाला पसंती दर्शविली.
सहकारी संस्था गटात सर्वाधिक चुरश
सेवा सहकारी संस्थांच्या मतदारसंघात सर्वाधिक २२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यापैकी सर्वसाधारण गटात १४ उमेदवार मैदानात आहेत. सेवा सहकारी संस्था महिला मतदारसंघात चार, तर इतर मागासवर्गीय मतदारसंघात दोन उमेदवार नशीब आजमावीत आहेत. निरधीसूचीत जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती गटात दोन उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामीण भागात या गटातील मतदारांची संख्या अधिक असल्याने उमेदवारांना गावागावांत प्रचाराला जावे लागणार आहे.
ग्रामपंचायत व जाती-जमाती मतदारसंघ
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात एकूण चार उमेदवार आहेत. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात दोन उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात दोन उमेदवार आहेत.
अडते, व्यापारी व हमाल, मापारी मतदारसंघ
अडते, व्यापारी मतदारसंघात कपबशी चिन्हावरील दोन, तर टेबल व गॅस सिलिंडर चिन्हावरील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन उमेदवार निवडणूक लढत आहेत. या गटात छत्री पॅनेलचे उमेदवार नाहीत. हमाल, मापारी मतदारसंघात कपबशी व गॅस सिलिंडर चिन्हावरील दोन उमेदवार मैदानात असून, येथेही छत्री चिन्ह गायब आहे.