राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात भंडारा सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:29 AM2017-07-19T00:29:21+5:302017-07-19T00:29:21+5:30
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात भंडारा जिल्हा आरोग्य विभागाने सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात भंडारा जिल्हा आरोग्य विभागाने सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिता बढे यांचा आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात भंडारा जिल्ह्याने १५९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे हा गौरव करण्यात आला आहे. तुमसर उपजिल्हा रूग्णालयाला कायाकल्प योजनेअंतर्गत १ लाखाचा पुरस्कार देण्यात आला. रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.सचिन बाळबुद्धे यांनी पुरस्कार स्वीकारला.
मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव डॉ.विजय सतबिरसिंग, विभागाचे आयुक्त डॉ.प्रदीप व्यास, संचालक डॉ.सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील, उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सन २०१६-१७ मध्ये भंडारा जिल्हा रूग्णालयाने २ हजार ३२ स्त्री शस्त्रक्रिया, २ हजार ११ पुरुष शस्त्रक्रिया व पिपीआययुसीडी ४ हजार ४२५ अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या व्यतिरिक्त वर्षभरात केलेल्या अतिउत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते यांना अवार्ड घोषित करण्यात आले. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १६४.२७ टक्के कार्य करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब कल्याण पीपीआययु सीडी कार्यक्रमात १५८.८९ टक्के, राष्ट्रीय बालआरोग्ळ कार्यक्रमात १ हजार २२२ शाळेमधील १ लाख ८८ हजार ६४८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीतून प्राप्त अनुदानाद्वारे १५ रुग्णांवर अतिशय अवघड व जटील व महागड्या १५ रुग्णांची टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आल्या. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त भंडारा जिल्हा रुग्णालयात या शस्त्रक्रिया पार पडल्या. हा उच्चांक आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात ए - १ ग्रेड मिळाली. या मध्ये १०० पैकी १०० मार्क घेऊन भंडारा जिल्हा रुग्णालय सर्वोत्कृष्ट घोषित करण्यात आला. या व्यतिरिक्त वर्षभरात महाआरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले व विविध प्रकारचे विशेषतज्ज्ञ सेवा येथे रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आली. अपंग प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता पूर्ण जिल्ह्यामध्ये अभियान घेण्यात आले. या व्यतिरिक्त अनेक अवघड शस्त्रक्रिया, लैप्रोस्कोपीक, अस्थिरोग, स्त्रि रोग, बालरोग शस्त्रक्रिया पार पाडण्यात आल्या. तसेच विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण व नाविण्यपूर्ण योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आल्या.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते यांनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व श्रेय समर्पीत रुग्ण सेवा व टीम वर्कला दिले. उत्कृष्ट नियोजन व रुग्णालयातील सर्व कॅडरचे डॉक्टर, नर्स, अधिकारी, कर्मचारी, सफाईगार, अॅम्बुलंस चालक व आरोग्य सेवेत कार्यरत सर्व समर्पीत सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करून तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्याबद्दल आभार व्यक्त करून हे पुरस्कार त्यांना समर्पीत केले.