महामार्गावरील भंडारा बायपास दशकापासून रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 09:33 PM2018-09-02T21:33:42+5:302018-09-02T21:34:03+5:30

शहराच्या अगदी मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. अजस्त्र वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिक कायम भीतीच्या सावटात असतात. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपासचा प्रश्न गत एक दशकांपासून रखडला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या अपघाताने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे पुन्हा बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

The Bhandara bypass on the highway has been halted for decades | महामार्गावरील भंडारा बायपास दशकापासून रखडला

महामार्गावरील भंडारा बायपास दशकापासून रखडला

Next
ठळक मुद्देवाहतुकीची कायम कोंडी : शहरातील नागरिक भीतीच्या सावटात, बेला अपघाताने प्रश्न पुन्हा ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराच्या अगदी मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. अजस्त्र वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिक कायम भीतीच्या सावटात असतात. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपासचा प्रश्न गत एक दशकांपासून रखडला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या अपघाताने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे पुन्हा बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भंडारा जिल्हा मुख्यालयाच्या शहरातून अगदी मधोमध कलकत्ता-मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. शहरातील मुख्य शासकीय कार्यालय आणि महत्वाच्या चौकातूनच हा महामार्ग जातो. अहोरात्र या मार्गावरून अवजड वाहनांसह भरधाव प्रवासी वाहने धावत असतात. दिवसाच्या वेळी या महामार्गावरून होणारी वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठणारी ठरत आहे. शहरातील या महामार्गावर ठिकठिकाणी चौक आहेत. या चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी अनुभवास मिळते. ट्रक चालक तर भरधाव आणि बेदरकारपणे शहरातूनही वाहन चालविताना दिसतात. त्यामुळेच शहरातील या महामार्गाला बायपास निर्माण करावा अशी मागणी दहा वर्षापूर्वी करण्यात आली होती. परंतु अद्यापही ती पूर्ण झाली नाही.
या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र मुजबी ते सिंगोरी या सहा किमी रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात आले नाही.
हा मार्ग अगदी भंडारा शहरातून जातो. महामार्गासाठी बायपासचा प्रश्न दशकापासून अधांतरीच आहे. एखादा लहानसाही अपघात झाला तरी शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. शनिवारी बेला येथे झालेल्या अपघातानंतर तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. भंडारा शहरात वाहनांच्या रांगाच्या रांगा दुपारी २ वाजेपर्यंत दिसत होत्या. यामुळेच भंडारा शहरासाठी बायपास आवश्यक झाला आहे.
अहोरात्र सुरु असते वाहतूक
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधून हा महामार्ग जातो. महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, भुसावळ, अमरावती, नागपूर, भंडारा आणि छत्तीसगडमधून दुर्ग, रायपूर, महासमुंद, संबलपूर असा हा मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरु असते. त्यातही अवजड वाहने आणि ट्रेलर शहरातून आले की वाहतुकीचा खोळंबा होतो.

Web Title: The Bhandara bypass on the highway has been halted for decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.