कुत्रा आडवा आल्याने कार उलटली; विद्यार्थी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 12:26 PM2021-12-04T12:26:32+5:302021-12-04T12:28:22+5:30
लाखांदूर तालुक्याच्या अंतरगावची घटना
लाखांदूर (भंडारा) : अचानक आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचविताना विद्यार्थ्यांना शाळेत सोडून देणारी कार उलटली. अपघात येवढा भीषण होता की, कारचे चारही चाके वर झाली. मात्र सुदैवाने या कारमध्ये प्रवास करणाऱ्या कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. हा अपघात लाखांदूर तालुक्याच्या अंतरगाव येथे शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला.
लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील एका खाजगी शाळेत शिक्षण घेतात. नियमितपणे विद्यार्थी आपल्या गावावरून लाखांदूर येथे बस व खाजगी वाहनाने येतात. विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे वाहन लाखांदूर येथून विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहोचविते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने व एसटी बंद असल्याने एका पालक गावातील विद्यार्थ्यांना कारने (क्रमांक एम. एच. ३६ ए जी ४५९८) भागडी येथून लाखांदूर येथे सोडून देत होते. साकोली - वडसा राज्यमार्गावरील अंतरगावजवळ कुत्रा आडवा आल्याने चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. कारचे चारही चाके वर झाली होती. हा अपघात पाहताच गावकरी धावले. त्यांनी कारमधून विद्यार्थ्यांसह चालकाला बाहेर काढले. या अपघातात एक विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाली. तिच्यावर लाखांदूर येथील एका खाजगी रुग्णालयात ऊपचार करण्यात आला. अपघातातील विद्यार्थी व चालक सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली.