रेती तस्कांराची पोलिसाला धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:34 PM2020-02-28T23:34:15+5:302020-02-28T23:35:10+5:30
मोहाडीच्या बेटाळा घाटावरील घटना
मोहाडी (भंडारा) : रेती तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस शिपायाला धक्काबुक्की करण्याची घटना मोहाडी तालुक्याच्या बेटाळा येथे घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध मोहाडी ठाण्यात शुक्रारवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तर याच घाटावर रेतीचा टिप्पर जप्त करुन चालकाला अटक करण्यात आली.
ट्रॅक्टर मालक केशव शेंडे व त्याचा मुलगा शुभम शेंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मोहाडी ठाण्याचे पोलीस शिपाई संजय बडवाईक शुक्रवारी सायंकाळी रेती तस्करांवर कारवाईसाठी बेटाळा रेती घाटावर गेले होते. त्यावेळी एक ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करताना दिसला. परवानगीच्या कागदपत्रांची मागणी करताच शेंडे पितापुत्राने त्यांना धक्काबुक्की केली. त्यांनी याप्रकाराची तक्रार रात्री मोहाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन दोघांविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा नोंदवला.
दरम्यान याच रेती घाटावर पोलिसांनी कारवाई करुन रेती भरलेला टिप्पर जप्त केला. या प्रकरणात चालक आदेश सोनवणे याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. शेंडे पितापुत्राचा शोध पोलीस घेत आहेत.