वाहनतळ नसलेले भंडारा शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:03 AM2019-04-13T11:03:09+5:302019-04-13T11:03:33+5:30
पितळी भांडी व कोसा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यासह शहरात वाहनतळाची सोय नाही. कदाचित ही बाब बाहेर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अंचबित वाटणारी असली तरी भंडारेकरांसाठी शरमेने मान खाली घालणारी आहे.
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पितळी भांडी व कोसा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यासह शहरात वाहनतळाची सोय नाही. कदाचित ही बाब बाहेर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अंचबित वाटणारी असली तरी भंडारेकरांसाठी शरमेने मान खाली घालणारी आहे. शहरातून फिरताना किंवा कामासाठी जाताना नागरिकांना वाहन कुठे उभे करावे, हा पहिला प्रश्न पडतो. शहरात कितीही शोधले तरीही रस्त्याच्या व्यतिरिक्त ‘पार्किंग झोन’ नसल्याचे लक्षात येताच ती मंडळी नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेला वाहन उभे ठेवतात. विशेह म्हणजे रविवारी या आठवडी बाजार व बुधवारी मिनी बाजाराच्या दिवशी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांनाही याच समस्येला सामोरे जावे लागते. परिणामी बाजारपेठेतील रस्तेच नव्हे, तर मुख्य मार्गही वाहनांच्या गर्दीपुढे खुजे झाले आहे. नगर रचनाकारांच्या आराखड्यातही शहरात कुठेही वाहनतळ आढळत नाही. परिणामी शहराची रचना कशी काय केली, हा एक प्रश्नच आहे. मुख्य मार्गाला जोडणाºया प्रत्येक मार्गावर दुतर्फा वाहनेच दिसतात. वाहनांच्या बिनदिक्कत होत असलेल्या पार्किंगमुळे अन्य मार्गाची कोंडी झालेली दिसून येते. नगर पालिका प्रशासन व वाहतुक शाखेकडून याबाबत थातुरमातूर हालचाली होत असताना दिसल्या तरी त्या उपाययोजना कायमस्वरूपी नाहीत. वाहतुकीची विस्कटलेली घडी बघायला मिळते. एखादा वाहतुक नियंत्रक विभागाचा अधिकारी शहराची वाहतुक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी यंत्रणा कडक करतो, तर तो अधिकारी तेथून बदलून गेल्यानंतर पुन्हा तीच स्थिती निर्माण होते. पोलीस अधिकारी सक्षम असणे यावर पर्याय नाही. रस्त्यावरच असलेल्या वाहनतळाचा होणारा अडथळा थांबण्यासाठी कायमस्वरुपी वाहनतळे उभारण्याची नितांत गरज आहे.