वैनगंगा नदीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 02:48 PM2018-11-18T14:48:21+5:302018-11-18T14:49:44+5:30
प्रेमीयुगुलाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा शहरालगतच्या कारधा येथे रविवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली.
भंडारा : प्रेमीयुगुलाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरालगतच्या कारधा येथे रविवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. एकमेकांचे हात ओढणीने बांधून त्यांनी नदी पात्रात उडी घेतली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशाल गणेश शेंडे (22) आणि दीक्षा मारबते अशी मृतांची नावे आहेत. भंडारा शहरालागत असलेल्या कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सकाळी दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना काही नागरिकांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ कारधा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक मासेमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. मृतदेहाजवळ आढळलेल्या मोबाइलच्या आधारे त्यांची ओळख पटली. विशाल मोलमजुरीचे काम करीत होता. विशालच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तो गुरुवारी सायंकाळी 6 वाजता शंभर रुपये घेऊन घरून निघून गेला. मात्र घरी परत आला नाही. त्याचा शोध घेऊनही पत्ता लागला नाही. त्यामुळे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. दरम्यान रविवारी सकाळी वैनगंगा नदीपात्रात त्याचा अाणि दीक्षाचा मृतदेह आढळून आला. दीक्षा आणि विशाल हे एकमेकांचे नातेवाईक असून आपल्या प्रेमाला विरोध होत असल्याने त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असावी असा कयास आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळल्याची माहिती होतात वैनगंगा नदी तीरावर नागरिकांची एकच गर्दी झाली होती.