भंडारा आगाराला लाभली जेष्ठ व महिलांची साथ; मिळाले १०.६ कोटीचे उत्पन्न
By युवराज गोमास | Published: January 8, 2024 02:03 PM2024-01-08T14:03:19+5:302024-01-08T14:04:28+5:30
महिला सन्मान, जेष्ठ नागरिक योजना : लालपरीच्या प्रवासाला पसंती
भंडारा : एसटी महामंडळाच्या भंडारा आगाराला महिला, जेष्ठ नागरिकांची साथ लाभली आहे. दररोज भंडारा आगाराचे शहरातील बसस्थानक महिलांच्या गर्दीचे फुलून निघते. परिणामी महिला व जेष्ठांची एसटीसोबत चांगली गट्टी जमली आहे. भंडारा आगाराने वर्षभरात महिला व जेष्ठ नागरिकांच्या प्रवासातून सुमारे १० कोटी ६ लाखाचे उत्पन्न कमविले आहे.
राज्याचे एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेत तत्पर असुन सोयी सुविधांकडे विशेष लक्ष दिले जाते. अपघात विरहित प्रवाशाला प्रधान्य दिले जात असल्यानेच राज्यातील प्रवाशांची पहिली पसंती एसटीलाच मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातही सर्वाधिक प्रवाशी आवडत्या लालपरीतून प्रवास करीत असल्याचे एकंदर वर्षभरात प्राप्त झालेल्या उत्पन्नावरून दिसून येत आहे.
राज्य शासनाने १७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजना सुरू केली. एसटी महामंडळाच्या साधी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, साधी वातानुकुलीत शिवशाही आसनी, शिवनेरी, शिवाई आदी बसेसमध्ये तिकिटाच्या ५० टक्के सवलत लागू केली. तसेच एसटीच्या ताफ्यामध्ये नव्या बसेस दाखल केल्या. स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त २५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोफत अमृत जेष्ठ नागरिक प्रवास योजना सुरू केली. दोन्ही योजनांमुळे महिलांचा लालपरीतील संचार वाढीस लागला आहे. एसटीलाही भरघोष कमाई करता आली आहे.
अन् सुधारली लालपरीची आर्थिक घडी
दोन वर्षाच्या कोरोना महामारीत एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे अर्थचक्र कोळमडले होते. महामंडळ डबघाईस आले होते. एसटीला भरारी घेण्यासाठी बराच अवधी लागेल, असेच चित्र निर्माण झाले होते. परंतु, एसटी महामंडळाने अल्पावधीत हा समज खोटा ठरविला. राज्य शासनाने सुद्धा विविध योजना लागू करून एसटीला जणू नवसंजीवनी दिली. त्यामुळे सध्या एसटीची आर्थिक नाडी सुधारली असून लालपरी सुसाट धावते आहे.
महिलांच्या प्रवासातून मिळाले ७.६२ कोटी
मार्च ते डिसेंबरपर्यंत भंडारा आगारामार्फत धावणाऱ्या विविध मार्गावरील बस फेऱ्यांतून सुमारे २९ लाख ५४ हजार ७५३ महिलांनी प्रवास केला. यातून सुमारे ७ कोटी ६२ लाख ८९ हजार ८२९ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
६.९१ लक्ष जेष्ठ नागरिकांनी केला प्रवास
जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत अमृत जेष्ठ नागरिक मोफत प्रवास योजने अंतर्गत सुमारे ३ लाख ५४ हजार ४२६ महिला व पुरूषांनी प्रवास केला. यामाध्यमातून भंडारा आगाराला १ कोटी ५० लाख ३७ हजार ६४४ रूपयांचे उत्पन्न मिळाले. याच कालावधीत ३ लाख ३६ हजार ६६९ जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला. यातून भंडारा आगाराला सुमारे ९३ लाख १३ हजार ७७५ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.
जिल्ह्यातील प्रवाशांनी कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा खासगीच्या तुलनेत एसटीच्या सुरक्षित प्रवाशाला प्राधान्य दिले आहे. त्यातच शासनाच्या विविध योजनांची साथ लाभली आहे. त्यामुळे भंडारा आगाराला चांगली कामगिरी करता आली.
संजना पटले,
आगार व्यवस्थापक, भंडारा.