भंडारा जिल्ह्यात १२३६ जागांसाठी २३७२ उमेदवार निवडणूक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:32 AM2021-01-05T11:32:53+5:302021-01-05T11:33:14+5:30
Bhandara News भंडारा जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या १२३६ जागांसाठी आता २३७२ उमेदवार रिंगणात असून, अखेरच्या दिवशी ३०७ उमेदवारांनी माघार घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या १२३६ जागांसाठी आता २३७२ उमेदवार रिंगणात असून, अखेरच्या दिवशी ३०७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. भंडारा तालुक्यात ३६ तर तुमसर तालुक्यात १६ उमेदवार अविराेध निवडून आले आहेत. आता चिन्ह वाटप झाल्याने मंगळवारपासून गावागावात निवडणुकीची राणधुमाळी उडणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वांचे लक्ष किती उमेदवार माघार घेतात याकडे लागले हाेते. साेमवार हा नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस हाेता. तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या ३०५ सदस्यांसाठी निवडणूक हाेत असून, साेमवारी ५७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ६९७ उमेदवार रिंगणात आहेत. ३६ उमेदवार अविराेध झाले आहेत. तुमसर तालुक्यातील १८६ जागांसाठी ४२५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेते. साेमवारी ३९ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता ३८६ उमेदवार रिंगणात आहेत. १६ उमेदवार अविराेध निवडून आले आहेत. साकाेली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीसाठी ३३४ जणांनी नामांकन दाखल केले हाेते. त्यापैकी ३९ जणांनी माघार घेतली. आता २९४ व्यक्ती रिंगणात आहेत.
लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ९९ जागांसाठी २४५ अर्ज दाखल हाेते. त्यापैकी २२ जणांनी माघार घेतल्याने २२३ उमेदवार कायम आहेत. माेहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीसाठी ३९९ व्यक्तींनी नामांकन दाखल केले हाेते. त्यापैकी ५० जणांनी माघार घेतली. ३४९ उमेदवार रिंगणात आहेत. लाखनी तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ४२३ उमेदवारांपैकी १०० जणांनी माघार घेतली. आता ३२३ उमेदवार रिंगणात आहेत.
चुल्हाड, पवनारखारी, अंबागड ग्रामपंचायतीत सर्वाधिक उमेदवार
ग्रामपंचायत निवडणुकीत प्राप्त माहितीनुसार सर्वाधिक उमेदवार तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे ३२, पवनारखारी ३२ आणि अंबागड ग्रामपंचायतीत २८ नामांकन कायम आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक उमेदवार असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पाेहरा, चुल्हाड ग्रामपंचायतीकडे जिल्हावासीयांचे लागले लक्ष
जिल्ह्यातील सर्वात माेठी ग्रामपंचायत लाखनी तालुक्यातील पाेहरा आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच तुमसर तालुक्यातील चुल्हाड ग्रामपंचायतही माेठी असून येथेही सर्वांचे लक्ष लागून आहे. आता उमेदवार आपल्या प्रचारासाठी मंगळवारपासून गृहभेटी देणार आहेत.
भंडारात ३६ उमेदवार अविराेध
भंडारा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीची निवडणूक हाेत आहे. ३०५ जागांसाठी ७५८ नामांकन दाखल झाले हाेते. त्यापैकी चार नामांकन बाद ठरल्याने ७५४ उमेदवार कायम राहिले. दरम्यान, साेमवारी ५७ उमेदवारांनी माघार घेतल्याने ६९७ उमेदवार रिंगणात आहेत. भंडारा तालुक्यातील ३६ उमेदवार अविराेध झाले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील एकही ग्रामपंचायत संपूर्ण अविराेध झाली नाही.