भंडारा जिल्ह्यात कोरोनाने महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:41 PM2020-09-14T21:41:06+5:302020-09-14T21:43:04+5:30
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ६५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यात ५० पुरुषांचा समावेश आहे. ५० वर्ष वयोगटावरील ३९ तर ५० वर्षाच्या आतील २६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक असून त्यातही वृध्दांची संख्या अधिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोनाने बळीची संख्या वाढत असून त्यात सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत ६५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यात ५० पुरुषांचा समावेश आहे. ५० वर्ष वयोगटावरील ३९ तर ५० वर्षाच्या आतील २६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक असून त्यातही वृध्दांची संख्या अधिक आहे.
कोरोनाने भंडारा जिल्ह्यात पहिला बळी १२ जुलै रोजी घेतला. शहरातील एका ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यात एकही मृत्यू नव्हता. त्यानंतर मृताची संख्या वाढायला लागली. ऑगस्ट महिन्यात मृत्यू संख्या वाढत गेली. सप्टेंबर महिन्यातही मृतांचा आकडा वाढतच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. त्यात ५० पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये ५० वर्षावरील सर्वाधिक पुरुष असल्याचे दिसून येते. तर आतापर्यंत १५ महिलांचा मृत्यू झाला असून त्यातही वृध्दांचाच अधिक समावेश आहे.
११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ५१ मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी १५ जणांचा मृत्यू नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत वेगाने वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
भंडारा तालुक्यात आतापर्यंत ४१ व्यक्तींचा मृत्यू कोरोनाने झाला असून त्यात सर्वाधिक मृत्यू भंडारा शहरातील आहे. त्या खालोखाल तुमसर तालुक्यात १२, मोहाडी ७, साकोली आणि पवनी तालुक्यात प्रत्येकी दोन तर लाखनी तालुक्यात अद्यापपर्यंत कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. भंडारा शहरात मृत्यूची संख्या नेमकी कशामुळे वाढत आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्यातरी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना वाईट अनुभव येत आहे.
बाधितांची संख्या तीन हजाराच्या उंबरठ्यावर
जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत दोन हजार ९६० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात १४९३ असून साकोली १९७, लाखांदूर ८९, तुमसर ३०१, मोहाडी ३१५, पवनी २४३, लाखनी तालुक्यातील ३०२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १४ हजार ७५४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २९६० व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. सध्या ११९७ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.
१६९८ व्यक्तींची कोरोनावर मात
कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे उपचाराखाली असणाऱ्या रुग्णापेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. २९६० कोरोनाबाधितांपैकी सोमवारी १३६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत १६९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ११९७ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. मात्र मृतांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.