भंडारा जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे उभ्या पिकांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 08:12 PM2019-12-04T20:12:43+5:302019-12-04T20:14:32+5:30
तीन अभयारण्य आणि दहा वनपरिक्षेत्रात विभागलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे वन्यप्राण्यांचे संकट वर्षानुवर्ष कायम आहे.
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तीन अभयारण्य आणि दहा वनपरिक्षेत्रात विभागलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे वन्यप्राण्यांचे संकट वर्षानुवर्ष कायम आहे. उभ्या पिकात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात असून रानडुकरांमुळे तर शेतकरी हैराण झाले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा तर वन्यजीव विभागाचे कायदे आड येतात. दुसरीकडे नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते.
भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच जिल्ह्यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. बहुतांश शेतीही जंगलालगत आहे. जंगलातील रानडुक्कर, हरिण, माकड आदी प्राणी शेतात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. धानाचे पीक हे अत्यंत नाजूक असते. एकदा खाली पडले की ते उभे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. रानडुकरांचा कळप शेतात शिरला की धानाचे पट च्या पट आडवे पाडले जातात. तसेच भाजीपाला पिकात हरिणासह इतर प्राणी शिरून मोठे नुकसान करतात. तृणभक्षी प्राण्यासोबतच हिंस्त्र प्राण्यांचीही भीती कायम असते. वाघ, बिबट आदी प्राणी शेतशिवारानजीक दिसले की शेतात जायला भीती निर्माण होते. मजूर तर शेतात यायला तयार नसतात.
भंडारा जिल्ह्यात नागझिरा व नवेगाव व्याघ्र प्रकल्प, कोका अभयारण्य आणि उमरेड कºहांडला अभयारण्य आहे. याठिकाणी वन्यप्राण्यांचा मुक्त अधिवास असतो. उन्हाळ्याच्या दिवसात प्राणी शेतशिवारात फिरून मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेतकरी या वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी विविध उपाय योजतात. परंतु त्यात यश येत नाही. वन्यप्राण्यांची शिकार झाली तर शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाऱ्यावर सोडून शेती करताना दिसून येतात. वन्यप्राण्यांची शेतीपिकांचे नुकसान केले तर वनविभागामार्फत भरपाई दिली जाते. परंतु या भरपाईसाठी शेतकऱ्यांना महिनोंमहिने पायपीट करावी लागते. ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने अनेक शेतकरी तक्रार करण्यासही पुढे येत नाही.
जिल्ह्यात १२०० चौरस किमी वनक्षेत्र
भंडारा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ३ हजार ७१६.६५ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १२०३.५५६ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. त्यात वन्यजीव विभागाकडे २२५.४८२ चौरस किलोमीटर तर मोहघाट रिसर्च सेंटरकडे ४.७८४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. २७७.७६७ चौरस किलोमीटरमध्ये संरक्षीत वन आणि ९९.६५४ किमीमध्ये झुडूपी जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मुक्त संचार सुरु असतो आणि हेच प्राणी शेतात शिरून नुकसान करतात.