नेत्रदानात भंडारा जिल्हा नागपूर विभागात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:25 AM2019-08-22T01:25:15+5:302019-08-22T01:25:38+5:30
नागपूर विभागात भंडारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला. जगातील तीन अंधांपैकी एक अंध अर्थात जगातील ३० टक्के अंध भारतात आहेत. जगात अंधांची संख्या पाच कोटीच्या पुढे असून एक कोटी ३० लाख अंध भारतात आहेत. त्यातही २० लाख बालकांची संख्या आहे.
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांनी कुणी जग पाहू शकते, त्यासाठी नेत्रदान करण्याची आवश्यकता आहे. अत्यंत मानवतावादी आणि पवित्र अशा कार्यात भंडारावासीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नेत्रदान चळवळीला पोषक वातावरण निर्माण करण्यात येथे यश आल्याने उद्दिष्टाच्या १३२ टक्के नेत्रदान करण्यात आले. यामुळे भंडारा जिल्हा नागपूर विभागात नेत्रदानात अव्वल ठरला आहे.
राष्ट्रीय अंधत्व निवारण व दृष्टीहीनता कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाने विविध उपक्रम राबविले. नेत्रदान चळवळीला पोषक असे वातावरण निर्माण केले. नागरिकांचाही त्याला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. २०१८ - १९ या वर्षात भंडारा जिल्ह्याला ४० नेत्र बुबुळे जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सदर वर्षात १५३ नेत्र बुबुळे संकलन करून १३२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. नागपूर विभागात भंडारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला. जगातील तीन अंधांपैकी एक अंध अर्थात जगातील ३० टक्के अंध भारतात आहेत. जगात अंधांची संख्या पाच कोटीच्या पुढे असून एक कोटी ३० लाख अंध भारतात आहेत. त्यातही २० लाख बालकांची संख्या आहे. पारदर्शक असणाऱ्या डोळ्याचे बुबुळ जीवनसत्व अ च्या अभावामुळे, डोळे येण्यामुळे, इजा होण्यामुळे किंवा आजाराने अपारदर्शक होऊन अंधत्व येते. दृष्टीदान मिळावे यासाठी देशात प्रतीक्षा करावी लागते.
त्यासाठीच नेत्रदान चळवळ व्यापक प्रमाणात राबविली जात आहे. कोणताही व्यक्ती नेत्रदान करू शकतो. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक आहे.
मृत्यूनंतर वैद्यकीय चमू नेत्रदान स्वीकारते. भंडारा जिल्ह्याला २०१८-१९ मध्ये ४० नेत्र बुबुळांचे उद्दिष्ट होते. मात्र यापेक्षा अधिक म्हणजे ५३ नेत्र बुबुळे संकलीत करण्यात आली. २०१४-१५ पासून नेत्रदान चळवळीला मोठे स्वरुप आले आहे.
यावर्षी ९६ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. २०१५-१६ मध्ये ९० टक्के, २०१६-१७ मध्ये ९४ टक्के, २०१७-१८ मध्ये १०२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. भंडारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनात नेत्रदान चळवळ राबविली जात आहे. यासाठी नेत्र शल्यचिक्तिसक डॉ.रेखा धकाते, डॉ.विनोद घडसींग, डॉ.करुणा खोब्रागडे, डॉ.दुर्गेश पशिने, डॉ.धीरज लांबट, नेत्र चिकित्सा अधिकारी अजय आगाशे, संजय शेंडे, केशव राऊत, मुर्खे प्रयत्न करीत आहेत.
रात्री-बेरात्री वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नेत्र संकलनाचे कार्य केले जाते. नेत्र समुपदेशक सोनाली लांबट आपल्या समुपदेशनातून नागरिकांना नेत्रदानाची महती पटवून देतात.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेत प्रथम
राष्ट्रीय अंधत्व निवारण व दृष्टीहीनता कार्यक्रमांतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेत भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात अव्वल ठरले आहे. उद्दिष्टाच्या १९८ टक्के नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. गत २०१४-१५ पासून उद्दिष्टाच्या दुप्पट मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. २०१४-१५ मध्ये २३२.३७ टक्के, २०१५-१६ मध्ये १८४.९९ टक्के, २०१६-१७ मध्ये १४७.३६ टक्के, २०१७-१८ मध्ये २४० टक्के आणि यंदा १९८ टक्के मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींना दृष्टी मिळते. त्यामुळे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाने नेत्रदान चळवळीसाठी व्यापक मोहीम हाती घेतली. समूपदेशनाच्या माध्यमातून नेत्रदान करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळेच भंडारा जिल्हा नेत्रदानात नागपूर विभागात अव्वल ठरला आहे.
-डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा.