यू-डायस प्लसच्या कामात भंडारा जिल्हा प्रथमस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:33 AM2021-05-22T04:33:07+5:302021-05-22T04:33:07+5:30
आधार कार्ड क्रमांकाप्रमाणेच आता एकाच क्रमांकावर विद्यार्थ्याची आणि शाळांची शैक्षणिक माहिती यू-डायसवर उपलब्ध झाली आहे. याच क्रमांकावरून राज्यातील ...
आधार कार्ड क्रमांकाप्रमाणेच आता एकाच क्रमांकावर विद्यार्थ्याची आणि शाळांची शैक्षणिक माहिती यू-डायसवर उपलब्ध झाली आहे. याच क्रमांकावरून राज्यातील कोणत्याही शाळेची आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एका क्लिकवर पाहता येते. यू-डायस प्लसवर २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाची माहिती शाळांना अपलोड करायची. ही माहिती अपलोड करण्याच्या कामात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर चंद्रपूर जिल्हा, तर तिसरे स्थान गोंदिया जिल्ह्याचा आहे. राज्यात विदर्भातील पहिल्या तीनमध्ये राज्याच्या टोकावरील जिल्हे आहेत. भंडारा जिल्ह्यात १३२४ शाळा आहेत. त्यांपैकी सर्वच शाळांनी यू-डायस प्लसवर माहिती भरली आहे. भंडारा जिल्ह्याचे काम १०० टक्के झाला आहे. मुख्याध्यापकांनी यू-डायस प्लसवर भरलेली माहिती २८ मेपर्यंत तपासून घेता येईल. त्यात दुरुस्ती करता येईल. त्यानंतर माहिती अंतिम केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषद भंडाराचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनोहर बारस्कर यांनी दिली. यू-डायस या प्रणालीमुळे विद्यार्थ्याने शाळा बदलली तरीही त्याची शैक्षणिक माहिती केवळ कोड नंबरवरून ट्रान्स्फर होऊ शकते. तसेच प्रत्येक शाळेलाही ‘यू-डायस' कोड नंबर दिलेला आहे. या कोडवरून राज्यातील कोणत्याही शाळेची माहिती इंटरनेटवर पाहता येणे शक्य आहे. बनावट पटसंख्येला चाप बसण्यासाठी शिक्षणक्षेत्रात चर्चित असलेल्या ‘यू-डायस’ या डिजिटल सिस्टीमची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील प्रत्येक शाळेला आणि तेथील विद्यार्थ्यांना विशिष्ट कोड नंबर दिलेले आहेत. या कोड नंबरवरून त्यांची माहिती मंत्रालयातील सचिव एका क्लिकवर पाहू शकतात. ‘स्टुडंट आयडेंटिफिकेशन नंबर’ आणि ‘युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन फॉर एज्युकेशन’ (यू-डायस) अशी त्यांची नावे आहेत.
शाळांना अकरा अंकी कोड नंबर दिलेला आहे. यातील पहिले दोन आकडे म्हणजे जिल्ह्याचा कोड नंबर आहे. त्यानंतरचे दोन आकडे म्हणजे तालुक्याचा कोड नंबर आहे. त्यानंतरचे आकडे हे शाळेचे कोड नंबर आहेत. त्यानंतर पुढे विद्यार्थ्याचा क्रमांक आहे. एखादा विद्यार्थी कोणत्या शाळेत, कोणत्या वर्गात शिकत आहे. यापूर्वी तो कोणत्या शाळेत होता, तेथे त्याची प्रगती काय होत, याची माहिती या कोडवरून मिळू शकते. प्रत्येक शाळेला ‘यू-डायस’ या पद्धतीने कोड दिलेले आहेत. त्या कोडवर त्यांच्या शाळेतील पटसंख्येसह इतर माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक शाळेने ही माहिती संगणकावरून अपडेट केली आहे.