भंडारा जिल्हा सन्मानित
By Admin | Published: June 5, 2017 12:15 AM2017-06-05T00:15:16+5:302017-06-05T00:15:16+5:30
३१ मार्च २०१७ रोजी हागणदारीमुक्त घोषित झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेचा गौरव केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुंबई....
स्वच्छ महाराष्ट्र पुरस्कार : अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ३१ मार्च २०१७ रोजी हागणदारीमुक्त घोषित झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेचा गौरव केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या सोहळ्यात केला. राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या चमूला गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, ना.सदाभाऊ खोत, केंद्रीय सचिव परमानंद अय्यर, राज्याचे प्रधान सचिव राजेशकुमार, वासोचे संचालक डॉ.सतिश उमरीकर, जलस्वराजचे प्रमुख राघवन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र हे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शहद अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे तसेच जिल्हा कक्षाची चमू उपस्थित होती.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सरकारने सन २०१६-१७ मध्ये १० जिल्ह्याची निवड केली होती. यात भंडारा जिल्ह्याचा समावेश होता. या अनुषंगाने जिल्ह्याचे ३१ मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे.
सन २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
संपूर्ण हागणदारीमुक्त ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाची बाब असून स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वितेची वाटचाल आहे.
संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीने पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने कृती आराखडा तयार करून योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली. तसेच गावकऱ्यांच्या भागीदारीने व प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे जिल्हा हागणदारीमुक्ती मुक्त होऊ शकला.
जिल्हा परिषदेत राबविणार स्वच्छता अभियान
जिल्हा परिषद कार्यालयात महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. तसेच सर्व पंचायत समिती कार्यालयातही ही मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे परिसर स्वच्छ राहून आरोग्य व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या छतावरील पाणी वाया जावू नये यासाठी रेन हार्व्हेस्टिंग करण्याची योजना असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर उपस्थित होत्या.