भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; केवळ ८६ ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 08:29 AM2021-06-24T08:29:45+5:302021-06-24T08:31:17+5:30
Bhandara news कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत १२ हजार ८८७ पर्यंत पोहोचलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता अवघ्या ८६ वर आली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत १२ हजार ८८७ पर्यंत पोहोचलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता अवघ्या ८६ वर आली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारीही केवळ एकच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी सर्वांना आशा आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येचा उद्रेक झाला होता. मृत्यूचे तांडवही सुरू होते. १८ एप्रिल रोजी सर्वाधिक १२ हजार ८४७ ॲक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात होते. सर्व रुग्णालय फुल्ल झाली होती. शासकीय आणि खासगी रुग्णालयांत खाटा मिळवण्यासाठी धडपड करावी लागत होती. ऑक्सिजन सिलिंडरसाठीही नातेवाइकांची दमछाक होत होती. अशा भयावह परिस्थितीनंतर आता दोन महिन्यांनी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. गत काही दिवसांपासून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात तुमसर आणि पवनी तालुक्यात तर केवळ चारच ॲक्टिव्ह रुग्ण आहे. मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर येथे प्रत्येकी ११ तर साकोलीत १७ आणि भंडारा तालुक्यात १८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातही रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याएवढी आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.
मृत्यूची संख्या नियंत्रणात
जिल्ह्यात गत महिनाभरापासून मृत्यूची संख्या नियंत्रणात आहे. गत २३ दिवसांत एक अपवाद वगळता मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ११२५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्येसोबतच मृत्यूही नियंत्रणात असून दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
सूट मिळताच नागरिक झाले बेजबाबदार
कोरोना संसर्गाची दुसरी लाट आणि मृत्यूचे तांडव अनुभवल्यानंतरही नागरिक कोरोना नियमांचे पालन करताना दिसून नाही. बुधवारी भंडारा शहरातील भाजीबाजारासह विविध ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. गणेश शाळेच्या प्रांगणात भरविण्यात येणाऱ्या भाजीबाजारात पाय ठेवायलाही जागा नव्हती. विशेष म्हणजे अनेक जण मास्क लावलेले नव्हते. दुकानदारही मास्कशिवाय विक्री करताना दिसत होते. यामुळे पुन्हा कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे.