भंडारा जिल्हा लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:00 AM2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:01:02+5:30
भंडारा जिल्ह्यात कोरोना संशयीत ३० रुग्ण आढळले असून त्यापैकी १६ व्यक्तींना होम क्वॉरंटाईन आणि १४ व्यक्तींना नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करुन जिल्ह्यातील सर्व काळी-पिवळी टॅक्सी, अॅटो रिक्क्षा, कार,जीप, सुमो ट्रॅवल्स तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी आदेश देवूनही नागरिक रस्त्यावरच येत असल्याने अखेर सोमवारी भंडारा जिल्हा लॉकडाऊन करण्यातआला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम. जे. प्रदिपचंद्रन यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सोमवार रात्री ८ वाजतापासून जिल्ह्यातील सर्व वाहने तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात कोरोना संशयीत ३० रुग्ण आढळले असून त्यापैकी १६ व्यक्तींना होम क्वॉरंटाईन आणि १४ व्यक्तींना नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करुन जिल्ह्यातील सर्व काळी-पिवळी टॅक्सी, अॅटो रिक्क्षा, कार,जीप, सुमो ट्रॅवल्स तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहे. यामधून अत्यावश्यक सेवा, अधिकारी, कर्मचारी, किरणा माल, भाजीपाला, दूध, औषधी, स्वास्थ्य सेवेची वाहने वगळण्यात आली आहे. तर दुसºया आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व धर्म, जातीचे देवस्थान, मंदिर, धार्मिक संस्था सार्वजनिक ठिकाणी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
रविवारी आयोजित जनता कफर्यू नंतर सोमवारी सकाळपासूनच नागरिक रस्त्यावर निघाले होते. पोलीस वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर दिसत होते. दरम्यान सायंकाळी राज्यात संचारबंदी लागू झाल्याने पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या. आंतरराज्यीय सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशाकडे जाणारे सर्व मार्ग रोखून धरण्यात आले आहे. तर भंडारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणारी सर्व वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहे.
भंडारातील अंतर्गत रस्त्यांवर बॅरिकेट्स
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भंडारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून नागरिकांना जाणे-येणे करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, मोठा बाजार मार्ग, खांब तलाव चौक, किसान चौक यासह शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. पोलिसांचे वाहन सारखे सूचना देत शहरातील विविध मार्गावरुन फिरताना दिसत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, घरातच बसून राहावे, असे आवाहन केले जात आहे. भंडारा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पध्दतीने बॅरिकेट्स लावून वाहतूक अडविण्यात आली आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश पोलिसांकडून दिले जात आहे.
आॅनलाईन बँकीग जागृती
जिल्ह्यातील सर्व बँका पत संस्थानी रोख भरणा व रोख काढणे प्राध्यान्याने करावी, ग्राहकांना कमीत कमी वेळ बँकेत उभे राहता येईल, अशी व्यवस्था करावी तसेच आॅनलाईन बँकीगबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.